नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ऑफर देत असेल तर मी भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू होण्यास मनापासून इच्छुक आहे, हे उद्गार आहेत पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याचे! संधी मिळत असेल तर मी भारतीय भूमीतील जलद, आक्रमक युवा गोलंदाज शोधू शकेन, असा त्याचा दावा आहे. हॅलो या सोशल नेटवर्किंग ऍपशी तो येथे बोलत होता.
भारतीय गोलंदाजी प्रशिक्षण पथकात कार्यरत होणे आवडेल का, या प्रश्नावर त्याने वरील मत मांडले. सध्या भारतीय गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी भरत अरुण सांभाळत आहेत.
‘स्वतः जलद गोलंदाजी केली असल्याने मला याची उत्तम कल्पना आहे. मी जे शिकलो, ते माझे ज्ञान आहे आणि ते ज्ञान मी इतरांना वाटू इच्छितो. भारतात नव्या पिढीत अनेक जलद गोलंदाज असतील आणि त्यांना योग्यवेळी हेरले तर भविष्यात त्यांना याच लाभ होऊ शकतो. आयपीएलमधील उद्घाटनाच्या आवृत्तीत मी केकेआरकडून खेळलो असून संधी मिळाल्यास त्या संघालाही गोलंदाजी प्रशिक्षण देण्यासाठी मी इच्छुक आहे’, असे अख्तर पुढे म्हणाला.
1998 मधील भारत दौऱयात सचिनशी अनेकदा जुगलबंदी रंगली, त्याचा उल्लेख शोएबने येथे केला. ‘मी त्यापूर्वी सचिनला पाहिले होते. पण, भारतात त्याचे नाव मोठे असेल, याची मला कल्पना नव्हती. भारतात त्याला देव का मानतात, याची प्रचिती मी सर्वप्रथम चेन्नईत घेतली. अर्थात, माझी त्याच्याशी उत्तम मैत्री आहे आणि भारतातही माझा मोठा चाहतावर्ग आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो’, असे त्याने पुढे नमूद केले.