ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते.
शोपियांमधील मणिहाल येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली. या शोधमोहीमेदरम्यान मणिहाल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या परिसरात शोधमोहीम सुरू असून, आणखी दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरल्याची माहिती मिळते. दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नसल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.