ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू काश्मीरच्या शोपियांमधील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. मृत दहशतवाद्यांमध्ये बिहारमधील वीरेंद्र पासवान याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. दिलबाग सिंह म्हणाले, गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे लष्कराच्या तुकडीने शोपियांमध्ये सोमवारी सायंकाळी शोधमोहिम सुरू केली. इमामसाहब परिसरातील तुलरान येथे सुरक्षा दलांनी तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले होते. सुरक्षा दलांनी त्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे
दरम्यान, सोमवारी जम्मू काश्मीरमधील पुंछ जिह्यात घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या पाच जवानांना वीरमरण आले होते.