ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील हाडीपोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
सुरक्षा दलाने शनिवारी दुपारपासून हाडीपोरात शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाचा सुगावा लागताच सुरक्षा दलाने त्यांना शरण येण्याची विनंती केली. मात्र, दहशतवाद्यांनी नकार दिला. यावेळी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या भागात चकमक सुरू होती. त्यावेळी आणखी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे तिन्ही दहशतवादी अल बद्री संघटनेशी संबंधित होते.
या चकमकीनंतर सुरक्षा दलाकडून पुन्हा हाडीपोरा परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारपासून शोपियां जिल्ह्यात शोधमोहीम सुरू असून, मागील 48 तासात 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.