श्रीनगर / वृत्तसंस्था
शोपियानमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा शोपियानच्या तुर्कवांगम भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यामध्ये एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याची माहिती शुक्रवारी सकाळी देण्यात आली. तसेच या भागात आणखी काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली असून सुरक्षा दलाकडून दिवसभर शोधमोहीम सुरू होती. या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून रहदारीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा फौजफाटा वाढवण्यात आला आहे.
तुर्कवांगम परिसरात गुरुवारी काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी तत्काळ कारवाई करत शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा जवानांना दहशतवादी लपलेले ठिकाण सापडल्यानंतर त्यांच्यात चकमक झाली. या भागात अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय असल्याने शोधमोहीम कायम ठेवण्यात आली होती.