सावंतवाडी/प्रतिनिधी-
१० मार्च ते २७ मार्च कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धा संपन्न झाली. या नाट्य स्पर्धेत सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट संस्था संगीत मत्स्यगंधा नाटक घेऊन सहभागी झाली होती. प्रयोगावेळी २ अंक सुरळीत पार पडल्यावर नाटकातील मुख्य भूमिकेत (भीष्म) असलेल्या बाळ पुराणिक यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रत्नागिरी येथे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाटकात उद्भवलेल्या अनपेक्षित घटनेने नाटकातील कलावंतांसह आयोजकांवर दडपण आले. मात्र रत्नागिरी येथील नितीन जोशी या रंगभूमीच्या सच्च्या सेवकाने उर्वरित नाटकात भीष्म साकार करण्याची तयारी दाखवली आणि संगीत मत्स्यगंधा नाटक यशस्वीरित्या पार पडले.
या स्पर्धेत या नाटकातील ‘सत्यवती’ची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पळसुले-देसाई हिला उत्कृष्ट गायनासाठी रौप्यपदक, ‘अंबा’ ही भूमिका साकारणाऱ्या पियुषा प्रभू-तेंडोलकर हिला उत्कृष्ट अभिनयासाठीचे रौप्यपदक तर नाटकाला ऑर्गनची साथ करणाऱ्या प्रसाद शेवडे यांना ‘उत्कृष्ट संगीत साथीचे’ द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. या यशाबद्दल क्षितीजचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.