हत्येनंतर आफताबचे अन्य युवतीसोबत डेटिंग : दिल्ली पोलिसांकडून तपासाला वेग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी श्रद्धा वालकर हत्येप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला महरौली येथील जंगलात नेत मृतदेहाच्या तुकडय़ांचा शोध घेतला आहे. 26 वर्षीय श्रद्धाच्या हत्येचा आरोप तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबवर आहे. हत्येनंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करत ते जंगलात फेकले होते असे चौकशीत समोर आले होते. मंगळवारी तपासकार्यादरम्यान श्रद्धाच्या मृतदेहाचे 10 हून अधिक तुकडे पोलिसांना सापडल्याचे समजते. हे तुकडे श्रद्धाच्याच मृतदेहाचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. तर आरोपी आफताबची नार्को चाचणी करविण्याची तयारी पोलिसांनी चालविली असून याकरता न्यायालयाकडून मंजुरी मिळविण्यात येणार आहे.
चौकशीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्येनंतर आफताबने संबंधित फ्लॅटवर आणखी एका युवतीला बोलाविले होते. यादरम्यान श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे याच फ्लॅटमधील फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आफताब हा डेटिंग ऍपद्वारे कित्येक युवतींच्या संपर्कात होता असे सांगण्यात येत आहे. पोलीस आता या डेटिंग ऍपवरील आफताबच्या प्रोफाइलची माहिती प्राप्त करणार आहेत. आफताब किती युवतींना भेटला होता आणि श्रद्धाच्या हत्येसाठी यातील एखादी युवती कारणीभूत होती का हे पोलीस तपासणार आहेत.
सापडलेले मृतदेहाच्या तुकडय़ांची फॉरेन्सिक तपासणी करत ते मानवी शरीराचे असल्याची पुष्टी मिळविली जाणार आहे. आफताबने मुंबई किंवा नजीकच्या परिसरात श्रद्धाचा मोबाइल फेकला होता. श्रद्धा महाराष्ट्रातच गायब झाल्याचा भास निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी आता आफताब आणि श्रद्धा दोघांच्या सामायिक मित्रांना चौकशीसाठी बोलाविले आहे.
आफताबला फासावर लटकवा
हा प्रकार मला लव्ह जिहादचा असल्याचे वाटत आहे. आफताबला फासावर लटकविण्यात यावे अशी माझी मागणी आहे. आफताबच्या संपर्कात मी कधीच आलो नव्हतो असे श्रद्धाचे वडिल विकास वालकर यांनी म्हटले आहे.
डेटिंग ऍपवर साधला होता संपर्क
बम्बल या डेटिंग ऍपद्वारे श्रद्धानेच आफताबशी संपर्क साधला होता असे आता समोर आले आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने बम्बल या डेटिंग ऍपद्वारेच अन्य युवतींशी संपर्क साधला होता. यातील एका युवतीला त्याने फ्लॅटवर बोलाविले होते. दुसरी युवती फ्लॅटवर आली होती, तेव्हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्येच ठेवण्यात आले होते. आफताबने मृतदेहाचे हे तुकडे कपाटात लपवून ठेवले हेते. दिल्ली पोलिसांनी आता बम्बल ऍप व्यवस्थापनाकडून अधिक माहिती मिळविण्याचा निर्णय घेतला आहे. हत्येनंतर आफताबच्या फ्लॅटवर आलेली युवती कोण याचा शोध आता पोलीस घेणार आहेत. कदाचित हीच युवती या हत्येसाठी कारणीभूत ठरली असावी असा संशय पोलिसांना आहे.
18 मे रोजी झाली होती हत्या
आफताब अन् श्रद्धा हे मुंबईतून 8 मे रोजी दिल्लीत पोहोचले होते. तेथे ते प्रथम पहाडगंज येथील हॉटेल आणि नंतर दक्षिण दिल्लीत राहत होते. दक्षिण दिल्लीनंतर महरौलीमध्ये त्यांनी भाडय़ाने फ्लॅट घेतला होता. दिल्लीत पोहोचल्याच्या 10 दिवसांनी म्हणजेच 18 मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती.
फ्लॅट मिळवून देणारा अटकेत
हत्या प्रकरणात बद्री नावाच्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. बद्रीनेच आफताबला महरौली भागात फ्लॅट मिळवून दिला होता. पोलीस आता या बद्रीची चौकशी करत आहेत. याच फ्लॅटमधून मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी आफताब जंगलात जात होता. हा फ्लॅट जंगलानजीक असल्यानेच त्याने याची निवड केल्याचे मानले जात आहे.
कापलेले शीर पाहण्याचे व्यसन
ज्या खोलीत आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते, त्याच खोलीत तो झोपत होता. याचबरोबर फ्रिजमध्ये त्याने मृतदेहाचे शीर कापून सुरक्षित ठेवले होते तसेच तो दररोज हे शीर पाहत होता. मृतदेहाचे उर्वरित अवयव काळय़ा रंगाच्या पिशवीत भरून जंगलात त्यांची तो विल्हेवाट लावत होता.
रक्त साफ करण्यासाठी गुगल सर्च
आफताबने गुगलवर सर्च करत मिळविलेल्या माहितीच्या आधारावर काही रसायनांद्वारे फरशीवरील रक्ताचे डाग साफ केले हेते. तसेच रक्ताळलेल्या कपडय़ांची त्यांनी विल्हेवाट लावली होती. प्रथम त्याने मृतदेह बाथरुममध्ये ठेवला होता. त्यानंतर नजीकच्या एका दुकानातून फ्रिज खरेदी करत त्यात मृतदेहाचे छोटेछोटे तुकडे करून तो फ्रीजमध्ये ठेवत होता.
दोघांमध्ये व्हायची भांडणे
आफताब एक फूड ब्लॉगर होता तसेच तो दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. आफताब अन् श्रद्धा यांच्यात वारंवार भांडण व्हायची. दोघेही लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी मुंबईतून दिल्लीत आले होते. श्रद्धाने दिल्लीत आल्यावर आफताबवर विवाहासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. यातून दोघांमध्ये भांडण होत होती. आफताब हा अनेकदा श्रद्धाला मारहाण करत होता.