नौदल अधिकाऱयासोबत करणार विवाह
चालू महिन्यात अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अंकिता लोखंडे आणि मौनी रॉय, कॅटरिना कैफ, राजकुमार राव यांच्या विवाहाविषयीचे वृत्त यापूर्वीच झळकले आहे. तर आता ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्य विवाहबंधनात अडकणार आहे. श्रद्धा मंगळवारी एक नव्या नात्यात बांधली जाणार आहे. श्रद्धाच्या घरी सोमवारी विवाहपूर्व विधी पार पडले असून त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहेत.
दिल्लीमध्ये श्रद्धा आणि राहुल यांचा हा विवाहसोहळा आयोजित होणार आहे. राहुल हा नौदलात अधिकारी आहे. या विवाहसोहळय़ात कुटुंबीय आणि काही निवडक मित्रमैत्रिणी सामील होतील. विवाहाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धाने 12 नोव्हेंबरपर्यंत स्वतःचे चित्रिकरण संपविले आहे. तर पुढील 2 आठवडे ती चित्रिकरणापासून दूर राहणार आहे.
श्रद्धा आर्य 2019 मध्ये नच बलिए या रिएलिटी शोमध्ये दिसून आली होती. यापूर्वी श्रद्धाने एका अनिवासी भारतीयासोबत एंगेजमेंट केली होती. पण काही काळानंतर दोघांनी हे नाते संपुष्टात आणले होते. वृत्तानुसार जयंतने श्रद्धाला अभिनयाच्या क्षेत्राला रामराम ठोकण्यास सांगितले होते. जयंतच्या याच मागणीमुळे श्रद्धाने या नात्यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.