केखले ते जोतिबा मंदिरापर्यंतच्या फरसबंदी मार्गाची स्वच्छता मोहिम
प्रतिनिधी / वारणानगर
केखले ते जोतिबा मंदिरापर्यंतच्या फरसबंदी मार्गाची स्वच्छता मोहिम श्रमदानातून दर रविवारी सुरु झाल्याने रस्त्याचे रुपडे पालाटले असून भाविक भक्तात समाधान पसरले आहे.
महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातील भाविक भक्तांचे लोकदैवत असलेल्या वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा येथील जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा पुर्वपार आहेत. त्यामधीलच एक पायवाट केखले ता. पन्हाळा गावातील गणेश मंदिरापासुन जाते हि पायवाट काही ठिकाणी घडीव दगडात आहे तर काही ठिकाणी अनघड दगडात पूर्वजानी केलेली आहे. पुर्वी या वाटेवरून जोतिबा डोंगराच्या उत्तरेकडील सातारा जिल्ह्यातील अनेक गावातून सासनकाठी व भाविक जात असत जवळपास वीस फुटाचा असणारा हा पायरी मार्ग काळाच्या ओघात या मार्गावर माती, दगड, गवत, झाडे निर्माण झालीत या रस्त्याची पायवाटच झाली त्यामुळे पायवाटने जाणारे भाविक, ट्रेकर्स कमी झाले भविष्यात हि दगडी पायऱ्याची पायवाट लुप्त होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
कोडोली ता. पन्हाळा गांवातील शिवदुर्ग ट्रेकर्स, गनिमी कावा, शिवप्रेरणा मंडळ, कोडोली फुटबॉल क्लब, माळभागचा राजा तरुण मंडळ, चावडी मंडळ, मॉर्निग वॉकर ग्रुप या सर्व ग्रुपच्यावतीने तसेच अनेक जोतिबा भक्त यांनी हि वाट स्वच्छ करण्याचे शिवधनुष्य उचलत दि. ३१ मेपासून दर रविवारी सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रमदानातून या फरसबंदी रस्त्याच्या स्वच्छतेला मोजक्याच व्यक्तीनी प्रारंभ करीत आज काही किलोमीटर हा मार्ग रुंदीकरणासह स्वच्छ केला असून आजच्या रविवारी स्वच्छता मोहिमेत शंभरा पर्यन्त भक्तानी सहभाग घेतला होता.
स्वच्छतेसाठी सहभागी होण्याचे आवाहन
केखले गणेशबाग ते जोतिबा मंदिर फरसबंदी मार्गाची स्वच्छता मोहिम दर रविवारी सकाळी सहा ते नऊ वा. या वेळेत होणार असून यामध्ये भाविक भक्तानी सहभागी व्हावे असे आवाहन राम पाटील यानी केले असून या कामात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले खोरे, कुदळ, पाटी, टिकाव हे साहित्य घेऊन सहभागी होणेसाठी नाव नोंदवण्याचे आवाहन केले आहे.