महिला काँग्रेसतर्फे मडगाव रेल्वे स्थानकावर उपक्रम
प्रतिनिधी / मडगाव
प्रदेश महिला काँग्रेसने आपल्या गरिमा या मोहिमेंतर्गत सोमवारी मडगावातील रेल्वे स्थानकावर रेल्वेने प्रवास करणाऱया महिला प्रवाशांना सॅनिटरी नॅपकीन्स व सॅनिटरी कीट्सचे वाटप केले. एकूण अडीचशे कीट्सचे वितरण यावेळी करण्यात आले.
सध्या श्रमिक रेल्वेतून मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये पाठविले जात आहे. यात महिलांचाही समावेश असून त्यांची सोय होण्यासाठी रेल्वे स्थानकावर ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती गोवा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली.
आम्ही लॉकडाऊनच्या काळात गेल्या महिन्याभरापासून वरील मोहीम राबवत आलो आहोत. सासष्टीतील मडगाव, फातोर्डा, बाणावली, नावेली व अन्य मतदारसंघांतील काही भागांमध्ये तसेच वास्को, सांताप्रुझ व अन्य मतदारसंघांतही सॅनिटरी कीट्स व सॅनिटरी नॅपकीन्सचे वाटप महिला काँग्रेसच्या सदस्यांनी केलेले आहे. उद्या म्हापशात ही मोहीम राबविली जाईल. नंतर अन्य भागांतही 5 जूनपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले.