प्रतिनिधी/ शिरोडा
श्रावण महिन्यात संपूर्ण महोल जसा सांस्कृतिक वातावरणाने फुलून जातो, तसाच जाईच्या सुगंधाने बहरुन येतो. यंदा कोरोना महामारीने हा सांस्कृतिक माहोल जसा लुप्त झाला, तसा जाईचा परिमळही फारसा दरवळाला नाही. जाईच्या फुलांचे पिक घटले, त्यामुळे मागणीही घटली आहे.
श्रावण हा सण व उत्सवांचा महिना. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया फोंडा तालुक्यात तर या महिन्यातील प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या मंदिरात उत्सव असतोच. त्यामुळे इतर फुलांप्रमाणे जाईच्या फुलांना विशेष मागणी असते. विविध मंदिरात देवाची पूजा जाईच्या फुलांनी बांधण्याची प्रथाही विविध मंदिरामध्ये आहे. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे जसा सर्वत्र निरुत्साह आहे, तसा जाईच्या फुलांनेही रुसवा धरलेला आहे. फोंडय़ातील म्हार्दोळ, बोरी व इतर भागात जाईच्या फुलांचे मळे लावून त्यावर उदर निर्वाह करणारी अनेक कुटुंबे आहेत. बोरी येथील ब्रह्मानंद नाईक हा तरुण फुलविक्रेता यंदा जाईच्या फुलांचे पिक अत्यंत कमी असल्याचे सांगतो.
दरवर्षी श्रावणात मोठय़ा प्रमाणात जाईच्या फुलांना मागणी असते. या वर्षी जाईचे उत्पादन तर कमी आहेच, शिवाय मागणीही बऱयाच प्रमाणात घटली आहे. त्याचा परिणाम या पारंपरिक फुल व्यवसायावर झालेला आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यापासून येथील मंदिरे बंद आहेत. मध्यंतरी गुडीपाढवा, अक्षयतृतीया या उत्सव काळात फुल व्यवसाय झालाच नाही. कारण परराज्यातून येणारी फुलांची निर्यातच बंद होती. श्रावण महिन्यात येथील स्थानिक जाईच्या फुलांचे उत्पादन होईल या आशेवर थांबलेल्या फुलविक्रेत्यांची निराशाच झाली आहे.
बोरीतील टॉपकोला ते बोरी पूल दरम्यान रस्त्याच्या बाजूला बरेच फुल विक्रेते दिसतात. त्यांच्याकडे जाईची फुले फारशी दिसत नाहीत. श्रावण महिना कोरडाच गेल्याने येत्या गणेश चतुर्थीच्या काळातही जाईची फुले मिळणे अवघड होतील असे त्यांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊन व पावसामुळे गणित बिघडले
जाईचे उत्पादन घटण्यामागील मुख्य कारण म्हणजे, श्रावण मासाचे यंदा लवकर झालेले आगमन, शिवाय मोठय़ा प्रमाणात पडणारा पाऊस असल्याचे काही फुल व्यावसायिकांनी सांगितले. दरवर्षी साधारण एप्रिल व मे महिन्यात जाईच्या मळय़ांची मशागत केली जाते. त्यानंतर झाडांना खतपाणी देऊन त्यांचे संगोपन केले जाते व जुलै महिन्याच्या अखेरीस जाईचा हंगाम सुरु होतो. मात्र यंदा लागवडीतील हे गणितच चुकलेले आहे. परिणामी उत्पादन घटले. बोरीतील बऱयाच युवा फुल विक्रेत्यांनी यंदाचा हंगाम मंदीत गेल्याचे सांगितले. बोरीतील या विक्रेत्यांकडून जाईचे पड मडगावच्या बाजारात प्रामुख्याने विकले जातात. मात्र यंदा लॉकडाऊन व इतर कारणामुळे बाजार बंद असल्याने जाईला मागणी घटली आहे. त्यामुळे बहुतांशी उत्पादकांना जाईची फुले रस्त्याच्या बाजूला बसून विक्री करणे भाग पडले आहे.