प्रतिनिधी / बेळगाव
लवकरच सुरू होणाऱया श्रावण महिन्यात कोणत्याही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे असल्यास महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी स्पष्ट केले आहे. परवानगी न घेता कोणतेही कार्यक्रम केल्यास संबंधितांवर आणि धार्मिक संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. श्रावण महिन्यातसुद्धा त्याचे पालन करणे आवश्यक आहे. बेळगावमध्ये श्रावण महिन्यात शहर परिसरातील देवालयांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि सर्व मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते. परंतु सध्या कोरोनाग्रस्तांची गर्दी वाढत असल्याने पालिकेने काटेकोर नियमावली केली आहे.
त्या अंतर्गत कोणतेही विशेष कार्यक्रम आयोजित करताना मंदिर आणि संस्था चालकांना परवानगी घ्यावी लागणार आहे. मंदिर परिसरात सामाजिक अंतर पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास व परवानगी न घेतल्यास सदर मंदिरांवर आणि धार्मिक संस्थांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.