पूजेसाठी लागणाऱया साहित्याने बाजारपेठ फुलली
प्रतिनिधी /बेळगाव
श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणातील शुक्रवारी घरोघरी वरदमहालक्ष्मीचे पूजन केले जाते. तसेच मंदिरांमध्ये देवीची आकर्षक आरास करून पूजन केले जाते. यावेळी दुसऱया श्रावण शुक्रवारनिमित्त बेळगावचे ग्रामदैवत असलेल्या बसवाण गल्लीतील महालक्ष्मी मंदिरात महिलांने दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून पूजाविधी सुरू होता. यावेळी महिलांनी ओटी भरली.
श्रावणातील दुसऱया शुक्रवारी शहरातील लक्ष्मी मंदिर, समादेवी मंदिर, कालिका मंदिर, नाथ पै सर्कलमधील अंबाबाई मंदिरात पूजा करण्यात आली होती. यावेळी देवीच्या दर्शनासाठी महिलांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. घरोघरी श्रावणातील लक्ष्मीची महिलावर्गाने पूजा केली.
यावेळी पूजेला शेवंती, केवडा, निशिगंध, झेंडू यासह अनेक फुलांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला. देवीसमोर पाच फळे ठेवून तिची आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिरात आणि घरामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. पूजेसाठी लागणाऱया साहित्याने बाजारपेठ फुलली होती.