प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाची संकटछाया श्रावण मासातील सण समारंभावर देखील परिणाम करणारी ठरत आहे. यामुळे श्रावणातील सोमवारचे व्रत व शिवालयांमध्ये होणारी गर्दी यावर देखील याचा परिणाम होणार आहे. आज श्रावण मासातील पहिला सोमवार असून श्रावण सोमवार मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र कोरोनाचे संकट दाट होत असतानाच प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत भक्तांना दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार आहे. यामुळे शिवालयांना येणारे यात्रांचे स्वरुप आणि प्रत्येक सोमवारी होणाऱया शिव जागरावर मर्यादा येणार आहेत.
शहरातील शिवालये प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार सुशोभिकरण करून सज्ज झाली आहेत. विद्युत रोषणाई पेक्षा सामाजिक संदेशावर भर देत ना हार, ना फुले, ना बेल, ना नारळ केवळ शिवलिंगाचे दर्शन हे सूत्र अवलंबत दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर भक्तांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तर विविध भागातील शिवमंदिराच्या व्यवस्थापन कमिटीने मंदिर खुले अथवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवालयांमधून शिवनामाचा गजर घुमणार असला तरी भक्तांच्या उधाणाला मात्र कोरोनाचा ब्रेक लागणार आहे.
रविवारी लॉकडाऊन
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने मध्यरात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागतात. यामुळे रविवारपासूनच मंदिर परिसर गजबजून जातो. भक्तिमय वातावरण व शिवनामाचा जयघोष यामुळे अनुभवायला मिळतो. मात्र रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने उत्सवावर मर्यादा आल्या. शनिवारी रात्री 9 पासून सोमवारी पहाटे 5 पर्यंत सर्व व्यवहार बंद असल्याने श्रावणी सोमवारची तयारी आधीच करावी लागली. मंदिर ट्रस्टींकडून शनिवारची पानाफुलांनी मंदिरांची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे दिसून आले. दर्शनासाठी मंदिरे खुली ठेवण्यात आलेल्या शिवालयांनी मास्कची सक्ती, सॅनिटायझर्सचा वापर आणि सामाजिक अंतराचे भान राखण्यासाठी पूर्वतयारी केल्याचे अनुभवायला मिळाले.
श्रद्धेने आचरण
श्रावण मासातील सोमवारला अधिक महत्त्व असून शिवव्रत म्हणून श्रावणी सोमवारचे आचरण केले जाते. दिवसभर व्रतस्थ राहून शिवलिंगावर धान्याची शिवामूठ वाहणे तसेच अभिषेक करणे, बेल तसेच पाने, फुले वाहिली जातात. यामुळे श्रद्धेने याचे आचरण होते. श्रावण मासात चार सोमवार असून पहिला आज दि. 27 जुलै रोजी आहे. 3 ऑगस्ट रोजी दुसरा, 10 ऑगस्ट रोजी तिसरा तर 17 ऑगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवार आहे.