जर्मन ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा
वृत्तसंस्था /मुलहीम ऍन डेर रुहर, जर्मनी
दोनदा ऑलिम्पिक पदक मिळविलेल्या भारताच्या पीव्ही सिंधूला जर्मन ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत पराभवाचा धक्का बसला. मात्र वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकलेल्या किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
सातवे मानांकन मिळालेल्या सिंधूला चीनच्या झँग यि मानकडून केवळ 55 मिनिटांत 14-21, 21-15, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. माजी जागतिक अग्रमानांकित के. श्रीकांतला येथे आठवे मानांकन मिळाले असून त्याने चीनच्या लु गुआंग झु याच्यावर 21-16, 21-23, 21-18 अशी मात केली. एक तास सात मिनिटे ही लढत रंगली होती. सिंधूसाठी युरोपियन टप्प्याची सुरुवात निराशाजनक झाली असेच म्हणावे लागेल. पुढील आठवडय़ात ती ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे.
झँगविरुद्ध सिंधूला हवा तसा सूर मिळाला नाही. पहिल्या गेममध्ये 5-5 वर असताना झँगने ब्रेक मिळविला आणि तिने सलग सहा गुण घेत 11-5 अशी ब्रेकपर्यंत आघाडी मिळविली. नंतर आघाडी कायम राखत तिने हा गेम जिंकून बढत घेतली. मात्र सिंधूने दुसऱया गेममध्ये जोरदार मुसंडी मारली आणि ब्रेकपर्यंत 11-10 अशी निसटती आघाडी घेतली. नंतर हळूहळू गुण वाढवत तिने हा गेम जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये झँगने पुन्हा नियंत्रण मिळविले आणि प्रारंभीच्या चुरशीनंतर ब्रेकला तिने 11-8 अशी बढत मिळविली. नंतरही तिने सिंधूला फारसे वरचढ होऊ न देता हा गेम जिंकून विजय साकार केला.