वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन : मनू-सुमीत यांचाही पराभव तर पूजा-संजना यांची माघार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
स्पेनमधील हुएल्वा येथे सुरू झालेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या साई प्रणीतला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला तर किदाम्बी श्रीकांतने सहज विजय मिळवित दुसऱया फेरीत स्थान मिळविले. याशिवाय दुहेरीच्या दोन भारतीय जोडय़ांना पराभवाला सामोरे जावे लागले.
2019 मध्ये या स्पर्धेत पदक पटकावत साई प्रणीतने 36 वर्षानंतर भारताला पदक जिंकून दिले होते. येथील लढतीत त्याने नेदरलँड्सच्या मार्क कॅल्जोविरुद्ध कडवा संघर्ष केला. पण अखेर त्याला 21-17, 7-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. प्रणीतने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती. पण बाजू बदल्यानंतर त्याची लय बिघडली आणि निर्णायक गेममध्ये 14-8 अशी भक्कम आघाडी घेऊनही ब्रेकनंतर कोर्ट बदलल्यावर त्याच्या खेळावर परिणाम झाला आणि मार्कने सलग पाच गुण घेत नंतर गेमसह सामनाही जिंकला.
माजी अग्रमानांकित के. श्रीकांतने स्पेनच्या पाब्लो अबायनचा 21-12, 21-16 असा सहज पराभव करीत विजयी सलामी दिली. दुसऱया फेरीत त्याची लढत चीनच्या लि शी याच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीत रेड्डी यांनी डेन्मार्कच्या जोएल ईपे व रासमुस काएर यांना फारसा प्रतिकारच केला नाही. डॅनिश जोडीने त्यांच्यावर 21-12, 21-16 अशी मात करीत आगेकूच केली. महिला दुहेरीत पूजा दंडू व संजना संतोष यांनी पहिला गेम 12-21 असा गमविल्यानंतर सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे नेदरलँड्सच्या ऍलीसा तिर्टोसेन्टोरो व इम्के व्हान डर आर यांना दुसऱया फेरीत पुढे चाल मिळाली.
दुहेरीच्या आणखी चार जोडय़ा आणि पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय यांचे सामने व्हावयाचे आहेत. प्रणॉयची लढत आठव्या मानांकित एन्ग लाँग अँगस या हाँगकाँगच्या खेळाडूशी होणार आहे.