इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा – एचएस प्रणॉयची घोडदौड
वृत्तसंस्था/ बाली
इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी भारताच्या किदांबी श्रीकांत, एच.एस.प्रणॉय, धृव कपिला- एन सिक्की रेड्डी यांनी आपले विजय नोंदवित पुढील फेरीत स्थान मिळविले.
2017 साली जकार्तामध्ये इंडोनेशिया खुल्या सुपर सिरीज प्रिमियर बॅडमिंटन स्पर्धेचे जेंतेपद मिळविणाऱया भारताच्या माजी टॉप सीडेड किदांबी श्रीकांतने पहिल्या फेरीतील सामन्यात 71 व्या मानांकित ख्रिस्टोचे 21-18, 15-21, 21-16 अशा गेम्स्मध्ये पराभव करत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 62 मिनिटे चालला होता. पुढील फेरीत 15 व्या मानांकित श्रीकांतचा सामना इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित जोनाथन ख्रिस्टीबरोबर होण्याची शक्यता आहे.
पुरूष एकेरीच्या अन्य एका सामन्यात भारताच्या एच.एस.प्रणॉयने मलेशियाच्या डेरिनचा 22-20, 21-19 अशा गेम्स्मध्ये 49 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या ध्रृव कपिला आणि एन.सिक्की रेड्डी यांनी इंडोनेशियाच्या द्वितीय मानांकित जोडी प्रवीण जॉर्डन आणि मेलाती ओकतेव्हाती यांचा 21-11, 22-20 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. मात्र पुरूष एकेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या हेन्स ख्रिस्टेन व्हिटोगसने भारताच्या पी.काश्यपचे आव्हान 21-10, 21-19 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेत मंगळवारी भारताच्या पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी आपले पहिल्या फेरीतील सामने जिंकून तिसऱया फेरीत स्थान मिळविले. मिश्र दुहेरीच्या अन्य एका सामन्यात इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित हाफीज फैजल आणि ग्लोरिया विडेजा यांनी भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सुमीत रेड्डी यांचा 21-15, 21-16 असा पराभव केला.