प्रतिनिधी / कोल्हापूर
सातवे (ता. पन्हाळा) येथील बंद असलेल्या श्रीकृष्ण ग्लुकोज सहकारी साखर कारखान्याची जमिन विकण्याचा प्रयत्न काही संचालकांकडून सुरु आहे. त्यामुळे या संस्थेला दिलेली जमिन व शेअर्सची रक्कम परत मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिंदेवाडी, सातवे ग्रामस्थांसह सभासदांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली.
निवेदनात म्हंटले आहे की, सातवे येथील श्रीकृष्ण सहकारी ग्लुकोज कारखान्याची सुमारे 12 वर्षापुर्वी नोंदणी करण्यात आली आहे. परंतु आजअखेर हा कारखाना बंद असून भविष्यात ही तो सुरू होण्याची शक्यता नाही. या कारखान्यासाठी शिंदेवाडी ग्रामस्थांनी विना अट जमिन दिली होती. परंतु या संस्थेतील काही संचालक ही जमिन बाहेरील व्यक्तींना विकुन सभासद व शिंदेवाडी ग्रामस्थांचे फसवणुक करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामधून ही जमिन स्वत: हडप करण्याचाही त्यांचा मानस दिसत आहे. तरी ही जमिन पुन्हा शिंदेवाडी ग्रामस्थांना परत द्यावी व सभासदांची शेअर्स रक्कम व्याजासह परत मिळावी ही विनंती. निवेदनावर उत्तम नंदूरकर, महादेव पाटील, नामदेव खामकर, दीपाली गोरड, बाबासो पाडळकर आदींसह ग्रामस्थांची नावे व सह्या आहेत.