साईराज चषक ग्रामीण क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्रीगणेश कणबर्गी संघाने मराठा स्पोर्ट्स तुरमुरी व ब्रम्हलिंग बेनकनहळ्ळी संघाचा, पीजे वॉरियर्सने सहारा स्पोर्ट्स संतीबस्तवाडचा सुपर ओव्हरमध्ये तर इंडियन बॉईज हिंडलगा संघाने बालाजी स्पोर्ट्स हलगा संघाचा आणि एसएस स्पोर्ट्स मुचंडी संघाने दक्ष स्पोर्ट्स निलजी संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. महांतेश हुक्केरी, संतोष सुळगे पाटील, शंकर होसमनी, आकाश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात श्रीगणेश कणबर्गी संघाने 8 षटकात 1 बाद 136 धावा केल्या. संतोष सुळगे पाटीलने नाबाद 81, अभिषेक पाटीलने 25, अमितने 22 धावा केल्या. त्याला उत्तर देताना तुरमुरी संघाने 8 षटकात 7 बाद 78 धावाच केल्या. अजयने 32, केवलने 21 धावा केल्या. कणबर्गीतर्फे अश्विनने 5 तर किरणने 2 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात श्रीगणेश कणबर्गीने 8 षटकात 2 बाद 124 धावा केल्या. संतोष सुळगे पाटीलने 67 तर अमितने नाबाद 32 धावा केल्या. त्याला उत्तर देताना ब्रम्हलिंग बेनकनहळ्ळी संघाने 8 षटकात 7 बाद 62 धावाच केल्या. प्रशांतने 21, राहुलने 20 धावा केल्या.
तिसऱया सामन्यात सहारा स्पोर्ट्स संतिबस्तवाडने 8 षटकात 5 गडी बाद 95 धावा केल्या. सागर जाधवने 47 धावा केल्या. पी. जे. वॉरियर्सतर्फे प्रवीणने 3 तर सचिनने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना पी. जे. वॉरियर्सने 8 षटकात 7 गडी बाद 95 धावा करून सामना टाय झाला. त्यात आकाशने 19 तर विकासने 18 धावा केल्या. संतीबस्तवाडतर्फे राजू व सागर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पंचांनी सुपर ओव्हर नियमांचा वापर केला. त्यामध्ये पीजी वॉरियर्सने 6 धावांनी सामना जिंकला. चौथ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 6 बाद 43 धावा केल्या. विनोदने 24 धावा केल्या. हिंडलगातर्फे शंकरने 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना हिंडलगाने 3.5 षटकात 3 बाद 44 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. सुशांतने 14 तर प्रतिकने 11 धावा केल्या. पाचव्या सामन्यात एसएस स्पोर्ट्स मुचंडीने 8 षटकात 9 बाद 69 धावा केल्या. महांतेशने 18, श्रीकांतने 14 धावा केल्या. निलजीतर्फे निंगानीने 3 तर संतोषने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना दक्ष स्पोर्ट्स निलजीने 8 षटकात 5 बाद 66 धावाच केल्या. त्यात निंगानीने 22 तर राजूने 14 धावा केल्या.
सोमवारी उपांत्यपूर्व फेरीचे सामने- 1) जगदंबा हंगरगा वि. मराठा स्पोर्ट्स मण्णूर 2) अयोध्या कडोली वि चव्हाटा स्पोर्ट्स कुदेमनी 3) श्रीगणेश कणबर्गी वि. पीजे वॉरियर्स बाळेकुंद्री 4) इंडियन बॉईज हिंडलगा वि. एसएस स्पोर्ट्स मुचंडी.