भाविकांची अलोट गर्दी
प्रतिनिधी /मडगाव
गोवा तसेच शेजारील कर्नाटक व महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जांबावली येथील श्री दामबाबाचा वार्षिक गुलालोत्सव काल मंगळवारी भक्तीभावाने साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे गुलालोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा गुलालोत्सवाला अलोट गर्दी लोटली होती.
कोरोना महामारी नियंत्रणात आल्याने यंदा गुलालोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गोव्याच्या कानाकोपाऱयातून भाविक दुपारीच जांबावलीत दाखल झाले होते. दुपारी 3.30 वाजता ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या वादनात दामबाबाच्या पालखीवर गुलाल उधळण्यासाठी हजारो हात सरसावले व संपूर्ण परिसर एका क्षणातच गुलाबी झाला.
पालखीवर गुलाल उधळल्यानंतर भाविकांनी पाणटय़ावर जाऊन आंघोळ केली. रात्री उशिरापर्यंत श्रीदामबाबाच्या दर्शनासाठी भाविका जांबावलीत गर्दी होती. गुलालोत्सवानंतर रात्री 11 वा. ‘नवरदेवाची वरात’ निघाली. त्यानंतर रात्री 12 वा. सदाबहार संगीताचा कार्यक्रम ‘संगीत सभा’ संपन्न झाला. आज बुधवार दि. 30 रोजी सकाळी 10 वा. होणाऱया ‘धुळपेट’ने जांबावलीच्या शिशिरोत्सवाची सांगता होईल.
मठग्रामस्थांसाठी एक पर्वणीच!
श्रीदामबाबाच्या शिशिरोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली होती. गेले सात दिवस विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आले. श्रीदामबाबाचा शिशिरोत्सव म्हणजे मठग्रामस्थांसाठी एक पर्वणीच असते. अनेक मठग्रामस्थांचा मुक्काम जांबावलीत होता. आज धुळपेट झाल्यानंतर मठग्रामस्थ पुन्हा मडगावात परतणार आहेत.
गुलालोत्सव सुरळीत व्हावा यासाठी केपे पोलिसांनी नियोजन केले होते. त्या प्रमाणे कुठल्याच अनुचित प्रकाराविना गुलालोत्सव साजरा झाला.