ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरच्या हरवान भागात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नाही.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने हरवान परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली होती. शोधमोहिमेदरम्यान पहाटे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. ठार झालेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन मॅगझिन, सात राऊंड, एक ग्रेनेड आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या 188 बटालियनच्या जवानांनी ही कारवाई केली होती.