25 तोळे सोन्याचे दागिने, रोकड लांबविली
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. श्रीनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 12 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लांबविला आहे. शुक्रवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून रात्री या संबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अन्वरसाब अब्बास कुन्नीभांवी यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. श्रीनगर येथील सेक्टर क्रमांक 6-अ मध्ये अन्वरसाब यांचे घर आहे. कॅम्प परिसरात त्यांचे फर्निचरचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता अन्वरसाब घरातून आपल्या दुकानाला गेले. त्यानंतर 12.15 वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी शाहीन व मुलगी या दोघी घराला कुलूप लावून त्याही दुकानाकडे गेल्या. दुपारी 4.15 वाजता ते घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. अन्वर व त्यांचे कुटुंबीय घरी पोहोचले त्यावेळी घरातील वस्तू विस्कटलेल्या होत्या. कपाटातील सुमारे 25 तोळे सोन्याचे दागिने व 1 लाख 4 हजार रुपये चोरटय़ांनी पळविल्याचे दिसून आले.
त्यानंतर तातडीने माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.