वार्ताहर/ सांबरा
श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 115 वा पुण्यतिथी उत्सव मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला.
दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत पारंपरिक पद्धतीने भजनाच्या गजरात प्रेमध्वज कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री 8 वाजता औदुंबर कट्टा येथे उत्सवाच्या पत्रिका वाचनाचा कार्यक्रम झाला. रात्रभर आमराईत भजन सेवा करण्यात आली. मंगळवार दि. 3 रोजी पहाटे 5 वा. नामस्मरण व श्रीपंत पुण्यस्मरणाचा कार्यक्रम झाला. तर 8 वाजता श्रींची पालखी गावातील पंत वाडय़ातून समारंभाने निघून आमराईतील मुख्य पंत मंदिरात पोहोचल्यानंतर श्रींची उत्सवमूर्ती व पादुकांची पारंपरिकरित्या स्थापना करण्यात आली. त्यानंतर दरवर्षी रात्रीच्यावेळी होणारी पालखी सेवा सकाळी अकरा ते दुपारी अडीच यावेळेत उत्साहात पार पडली. यावेळी नैवेद्य दाखविण्यात आला व दुपारी अडीचनंतर महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी 5 ते 6 यावेळेत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम पारंपरिक पदांच्या चालीवर पार पडला.
सायंकाळी 7 वाजता परतीच्या पालखी सेवेला प्रारंभ झाला. पालखी सेवेला मुख्य मंदिरातून सुरुवात झाली. भाऊसाहेब कट्टा अवधूत धुनी, नरसिंह मंदिर येथून प्रेमध्वज कट्टय़ाजवळ आल्यानंतर रितसर प्रेमध्वज उतरविण्यात आला. यावेळी आरती झाल्यानंतर पालखी गावातील वाडय़ात (सीताराम मंदिर) येथे पोहचल्यानंतर रात्री साडेदहा वाजता प्रसाद वाटप करून पुण्यतिथी उत्सवाची सांगता करण्यात आली.
यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे लाखो भक्तांच्या उपस्थितीत होणारा उत्सव अत्यंत साधेपणाने करण्यात आला. जरी पंत भक्तांची लाखोंच्या संख्येत उपस्थिती नसली तरी मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत झालेल्या पुण्यतिथी उत्सवात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. श्रींच्या घराण्याच्यावतीने संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजय पंतबाळेकुंद्री (अकोळ) व डॉ. श्रद्धा संजय पंतबाळेकुंद्री उपस्थित होत्या. या उत्सवात पंत भक्त पंतबाळेकुंद्री येथे असणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी भाग घेतला होता.