लंकेचा विंडीजवर तर द. आफ्रिकेचा आयर्लंडवर विजय
वृत्तसंस्था/ बॅसेटेरी (सेंट किट्स)
19 वर्षाखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या आयसीसी पुरूषांच्या विश्व युवा चषक क्रिकेट स्पर्धेत लंका आणि दक्षिण आफ्रिका संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. लंकेने विंडीजचा 3 गडय़ांनी तर दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 153 धावांनी दणदणीत पराभव केला.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या ड गटातील सामन्यात लंकेने यजमान विंडीजला 150 धावांवर रोखले. विंडीजच्या डावात लंकेच्या वेलालगेने 3 गडी बाद केले. पॅरीस आणि मॅथ्यू नंदू यांनी पहिल्या पाच षटकांत 20 धावा झमविल्या. मॅथ्यू नंदू 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर लंकेच्या वेलालगेने पॅरिसचा 16 धावांवर त्रिफळा उडविला. टेडी बिशप आणि विकहॅम यांनी समयोचित भागीदारी केल्याने विंडीजने 26 षटकांत 2 बाद 102 धावापर्यंत मजल मारली. बिशप 45 धावांवर बाद झाला. विकहॅमने अर्धशतक झळकविले. तो 56 धावांवर बाद झाला. डावातील 45 व्या षटकांत विंडीजने 3 चेंडूमध्ये 2 गडी गमविल्याने विंडीजला 250 धावांपर्यंत मजल मारता आली. जॉन्सन 47 धावांवर बाद झाला. डिपेझा खाते उघडण्यापूर्वी धावचीत झाला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या राजपक्षे आणि डॅनियल यांनी सावध फलंदाजी केली. तत्पूर्वी सलामीचा फलंदाज सी विक्रम सिंघे पहिल्याच षटकांत बाद झाला. डॅनियल 34 धावांवर तंबूत परतला. राजपक्षेने 76 धावांचे योगदान दिले. बंधाराने 40 धावा झळकविल्या. लंकेला विजयासाठी शेवटच्या 10 षटकांत 51 धावांची जरूरी होती. विंडीजच्या शिवशंकरने वेलालगेला 15 धावावर बाद केले. विंडीजच्या क्लार्कने रेव्हिन डिसिल्वाला 13 धावांवर त्रिफळाचीत केले त्यानंतर रेनुदा सोमारथनाने 27 चेंडूत 28 दावा जमवित आपल्या संघाला तीन गडय़ांनी विजय मिळवून दिला.
द. आफ्रिकेचा आयर्लंडला दणका
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात कर्णधार जॉर्ज व्हॅन हिरेडेनच्या शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 153 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 47 षटकांचा खेळविण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने 47 षटकांत 7 बाद 315 धावा जमविल्या. कर्णधार हिरेडेनने 93 चेंडूत 111 धावा झळकविल्या तर ब्रेव्हिसने 96 धावांचे योगदान दिले.
ब गटातील या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांचे गुण समान झाले असले तरी सरस धाव सरासरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडला मागे टाकले आहे. भारतीय युवा संघाने या गटात आघाडीचे स्थान घेत उपांत्यपूर्व फेरी यापूर्वीच गाठली आहे. भारताचा या गटातील शेवटचा सामना युगांडाविरुद्ध होणार असून दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात दुसऱया स्थानासाठी चुरस निर्माण झाली आहे.
शुक्रवारच्या सामन्यात प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडचा डाव 158 धावांत आटोपला. आयर्लंडच्या डावातील पहिल्याच षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या विल्सनने आयर्लंडचा सलामीचा फलंदाज किटाईमला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या डुहेर्टीने कनिंगहॅमला 11 धावावर त्रिफळाचीत केले. चार षटकांत आयर्लंडने 2 बाद 18 धावा जमविल्या होत्या. नॅथन मॅथ्यूरेने 42 तर रॉक्सने 33 व हॅम्फरेने 38 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे बोस्टने 26 धावांत 3 तर ऍल्डेरने 20 धावांत 3 गडी बाद केले.