गुवाहाटी / वृत्तसंस्था :
अनुभवी जलद गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन टी-20 संघ गुरुवारी 3 सामन्यांच्या मालिकेसाठी गुवाहाटीत दाखल झाला. गुवाहाटी शहरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्याविरोधात प्रचंड विरोध व हिंसाचार झाला असल्याने कडक सुरक्षाव्यवस्था तैनात असून सुरक्षाव्यवस्थेच्या ताफ्यातच लंकन संघाला त्यांच्या हॉटेलकडे नेण्यात आले. भारतीय संघ शुक्रवारी काही टप्प्यात येथे दाखल होईल. उभय संघातील पहिली टी-20 रविवारी खेळवली जाणार आहे.
‘दोन्ही संघांसाठी सराव सत्र ऐच्छिक आहे. श्रीलंकेचा संघ दाखल झाला असून भारतीय खेळाडूही शुक्रवारी येतील. यापूर्वी, शहरातील वातावरण अनुकूल नव्हते. पण आता परिस्थिती आटोक्यात आहे’, असे आसाम क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱयाने नमूद केले. डिसेंबर महिन्यात आसाममध्ये प्रचंड विरोधी मोर्चे काढले गेले असून यामुळे कर्फ्यू लागू झाला आणि त्याचा फटका रणजी व यू-19 चषक सामन्यांना बसला होता.
‘सध्या शहरात पूर्ववत स्थिती असून राज्य सरकार सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत आहे. त्यामुळे चिंतेचे कोणतेही कारण नाही’, असे आसाम क्रिकेट संघटनेचे सचिव देवजित साईकिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 39500 प्रेक्षकक्षमतेच्या बारसप्रा स्टेडियमवरील या लढतीसाठी 27 हजार तिकीटे यापूर्वीच विकली गेली आहेत.
‘आतापर्यंत सर्व जण ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागतात होते. यानंतर तिकीटविक्रीला आणखी उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे’, असे ते पुढे म्हणाले. उभय संघातील या मालिकेत येथील पहिल्या लढतीनंतर दुसरी टी-20 इंदोरमध्ये 7 जानेवारीला तर तिसरी व शेवटची टी-20 पुण्यात 10 जानेवारीला खेळवली जाणार आहे. या छोटेखानी मालिकेसह टी-20 वर्ल्डकप काऊंटडाऊनलाही सुरुवात होईल.
भारतीय संघ दि. 24 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामी सामन्यात लढण्यापूर्वी एकूण 8 टी-20 खेळणार असून त्यातील पाच लढती न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत.
माजी कर्णधार अँजिलो मॅथ्यूज व धनंजया डिसिल्वा यांना या मालिकेसाठी 16 सदस्यीय लंकन संघात पाचारण केले गेले आहे. मॅथ्यूजने यापूर्वी ऑगस्ट 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपली शेवटची टी-20 खेळली होती.
भारतीय संघासाठी या मालिकेच्या माध्यमातून जसप्रित बुमराहचे पुनरागमन होणार आहे. बुमराह पाठीवर शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर आता पूर्ण तंदुरुस्त झाला असून शिखर धवनही पुनरागमनासाठी सज्ज आहे. सलामीवीर रोहित शर्मा व जलद गोलंदाज मोहम्मद शमी यांना या तीन टी-20 सामन्यांमधून विश्रांती दिली गेली आहे.
श्रीलंका संघ : लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणतिलके, अविष्का फर्नांडो, अँजिलो मॅथ्यूज, दसून शनाका, कुशल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजया डीसिल्वा, इसुरु उदणा, भानुका राजपक्ष, दसुन फर्नांडो, वणिंदू राजा, कसून लहिरु कुमारा, कुशल मेंडिस, लक्सन मूनकन.
भारत-लंका टी-20 मालिकेची रुपरेषा
तारीख / सामना / वेळ / ठिकाण
5 जानेवारी / पहिली टी-20 / सायं. 7 वा. / गुवाहाटी
7 जानेवारी / दुसरी टी-20 / सायं. 7 वा. /इंदोर
10 जानेवारी / तिसरी टी-20 / सायं. 7 वा. /पुणे