वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा फलंदाज दनुष्का गुणतिलकाने कसोटी क्रिकेटमधून शनिवारी निवृत्तीची घोषणा केली. वनडे क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
30 वर्षीय गुणतिलका लंकन कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला गेला. 2018 साली त्याने आपली शेवटची कसोटी खेळली. गुणतिलकाने आठ कसोटीत 299 धावा जमविल्या असून त्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत त्याने 61 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली.
वनडे क्रिकेटमध्ये त्याने 44 सामन्यांत 36.19 धावांच्या सरासरीने 1520 धावा तर 30 टी-20 सामन्यांत त्याने 568 धावा केल्या आहेत. लंकन क्रिकेट मंडळाने गुणतिलका, कुशल मेंडीस आणि डिकवेला या तीन खेळाडूंवर यापूर्वीच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्यास एक वर्षांची बंदी घातली आहे. कोरोना संदर्भातील जैविक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने लंकन क्रिकेट मंडळाने या तीन क्रिकेटपटूंवर एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे.