गॅले येथील पहिली कसोटी : दुसऱया दिवसअखेर इंग्लंडची 2 बाद 98
वृत्तसंस्था/ गॅले
अँजेलो मॅथ्युजच्या शतकानंतर चंडीमल, डिकवेला आणि डी परेरा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान लंकेने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत पहिल्या डावात 381 धावा जमविल्या. इंग्लंडच्या अँडरसनने 6 गडी बाद केले. दुसऱया दिवसाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 2 बाद 98 धावा जमविल्या आहेत.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. या दुसऱया कसोटीत लंकेने 4 बाद 229 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. पण, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्यावर गोलंदाजी केली. दिवसातील पहिल्याच षटकांत शतकवीर मॅथ्यूज अँडरसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने आपल्या पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत केवळ 3 धावांची भर घालत 110 धावावर बाद झाला. त्यानंतर फिरकी गोलंदाज वूडने रमेश मेंडीसला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले.
दरम्यान, डिकवेला आणि डी परेरा यांनी सातव्या गडय़ासाठी 89 धावांची भागिदारी केल्याने लंकेला 381 धावापर्यंत मजल मारता आली. अँडरसनने डिक्वेलाला झेलबाद केले. त्याचे शतक 8 धावांनी हुकले. डिकवेलाने कसोटीतील आपले 16 वे अर्धशतक नोंदविले. त्याने 92 धावा जमविल्या. डी परेराने 67 धावांचे योगदान दिले. त्याने आपले सातवे कसोटी अर्धशतक झळकविले. सॅम करणने त्याला 6 धावांवर झेलबाद केले. लंकेचे तळाचे फलंदाज लवकर बाद झाले. लंकेचा पहिला डावात 139.3 षटकांत 381 धावांवर आटोपला. इंग्लंडतर्फे अँडरसनने 40 धावांत 6 तर मार्क वूडने 84 धावांत 3 आणि करेनने 60 धावांत 1 गडी बाद केला.
38 वर्षीय अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची त्याची ही 30 वी खेप आहे. लंकेविरूद्ध त्याने यापूर्वी म्हणजे 2012 साली गॅलेच्या कसोटीत 75 धावांत 5 बळी मिळविले होते. लंकेविरूद्ध आतापर्यंत दोनवेळा एका डावात 5 गडी बाद केले आहेत. जेम्स अँडरसनने न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सर रिचर्ड हॅडलीचा विक्रम मागे टाकला आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राचा विक्रमही मोडित काढला आहे. मॅकग्राने कसोटी क्रिकेटमध्ये 29 वेळा एका डावात 5 गडी मिळविले आहेत. लंकेचा पहिला डाव खेळाच्या दुसऱया सत्रात आटोपला.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली पण त्यांचे सलामीचे दोन फलंदाज केवळ 5 धावांत तंबूत परतले. इंबुलडेनियाने सलामीच्या क्रॉलेला 5 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर त्याने सिबेलीला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. बेअरस्टो आणि कर्णधार रूट यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 93 धावांची भागिदारी केली आहे. बेअरस्टो 24 तर रूट 67 धावांवर खेळत आहे. रूटचे 99 व्या कसोटीतील हे 50 वे अर्धशतक आहे.
लंका आणि इंग्लंड यांच्यातील सदर कसोटी मालिका कोरोना महामारी समस्येमुळे 2020 च्या मार्च महिन्यात रद्द करण्यात आली होती. आता ती प्रेक्षकविना खेळविली जात आहे. इंग्लंडचा संघ अद्याप 283 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव- 139.3 षटकांत सर्वबाद 381 (मॅथ्यूज 110, डिक्वेला 92, डी परेरा 67, चंडीमल 52, थिर्मेनी 43, अँडरसन 6-40, वूड 3-84, करेन 1-60), इंग्लंड प. डाव- 30 षटकांत 2 बाद 98 (क्रॉले 5, सिबेली 0, बेअरस्टो खेळत आहे 24, रूट खेळत आहे 67, इंबुलडेनिया 2-33).