वृत्तसंस्था/ कोलंबो
विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सोमवारी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट घेत त्यांच्यासोबत बहुआयामी द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्याकरता ‘सकारात्मक चर्चा’ केली आहे. श्रृगंला हे चार दिवसांच्या दौऱयानुसार शनिवारी श्रीलंकेत पोहोचले होते.
विदेश सचिव श्रीलंकचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांचीही भेट घेऊ शकतात तसेच भारत आणि श्रीलंकेच्या द्विपक्षीय संबंधांची समीक्षा करू शकतात. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
पंतप्रधान राजपक्षे यांच्यासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. ते भारताचे प्रगाढ मित्र असून दोन्ही देशांची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी त्यांचे निरंतर समर्थन प्राप्त होत असते. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांची भेट घेण्याबद्दल उत्सुक असल्याचे विदेश सचिवांनी नमूद केले आहे.
यापूर्वी श्रृंगला यांनी रविवारी श्रीलंकेच्या तमिळबहुल जाफना प्रांतातील पलानी विमानतळाची पाहणी केली होती. या ठिकाणी भारताच्या सहकार्यातून विकासकामे केली जात आहेत.