कोलंबो
जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाच्या विषाणुने आपला दबदबा वाढवायला सुरूवात केली असल्याचे दिसले आहे. यामागे डेल्टा व्हेरीयंटचा पसरलेला प्रकार कारणीभूत असल्याचे अनेकांचे मत आहे. सध्या याच डेल्टा व्हेरीयंटने पुन्हा श्रीलंकेत पदार्पण करत देशाची चिंता वाढवली आहे. सदर प्रकारातील कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे शेजारच्या भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णाची चाचणी केली असता बी. 1.617.2 एवाय 104 नावाने डेल्टा प्रकार आढळून आला. यापूर्वी श्रीलंकेत आढळलेल्या बी.1.617.2 डेल्टा व्हेरीयंटने धुमाकूळ घालून देशाला चिंतेच्या खाईत टाकले होते. याच व्हेरीयंटने नंतर भारतात एप्रिल-मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात धुमाकूळ घालत अनेकांना जीवानिशी नेले. पण आता श्रीलंकेत नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळल्याने श्रीलंकेची चिंता तर वाढवली आहेच पण दुसरीकडे यामुळे शेजारचा देश भारतालाही काळजीत टाकले आहे. नव्याने आढळलेल्या सदर डेल्टा प्रकाराचे नमुने अधिक तपासासाठी हाँगकाँगमधील प्रयोगशाळेत पाठवला असल्याचे सांगितले जाते.