शेजारी देशातील स्थिती बिकट : पेट्रोल पंपांवर मोठमोठय़ा रांगा
वृत्तसंस्था / कोलंबो
शेजारी देश श्रीलंका सध्या भयावह आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींच्या किमती गगनाला भिडत आहेत. डिझेल-पेट्रोल आणि गॅसप्रकरणी स्थिती तर अधिकच गंभीर झाली आहे. पेट्रोल खरेदी करण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेत अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. स्थिती बिघडल्याने सरकारने पेट्रोल पंप आणि गॅस स्टेशन्सवर सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेत डिझेल-पेट्रोलचे दर वाढण्यासह त्यांची टंचाई देखील निर्माण झाली आहे. याचमुळे पेट्रोल पंपांवर मोठमोठय़ा रांगा दिसून येत आहेत. हजारो लोक अनेक तास रांगेत उभे राहिल्यावर इंधन खरेदी करत आहेत. अशा रांगांमध्ये कित्येक तास उभे रहावे लागल्याने तीन वृद्धांचा मृत्यू ओढवला आहे. या घटनांनंतर पेट्रोल पंपांवर सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सैन्य केवळ इंधनाचे वाटप करण्यास मदत करणार आहे. गर्दीवर नियंत्रण आणणे सैन्याचे काम नसेल. देशाच्या सर्व पेट्रोल पंपांवर कमीत कमी 2 सैनिक तैनात करण्यात येतील. चुकीच्या पद्धतीने इंधन वाटप आणि साठेबाजीच्या तक्रारी मिळाल्यावर सैन्य तैनात करण्यात येत असल्याचा दावा सरकारचे प्रवक्ते रमेश पाथिराना यांनी केला आहे.
श्रीलंकेत अनेक गोष्टींची टंचाई निर्माण झाल्याने काही ठिकाणी हिंसाचारही घडला आहे. सोमवारी एका अशाच घटनेत एका इसमाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. सैन्य तैनात करण्यात आल्याने स्थिती सुधारणार असल्याची अपेक्षा अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. स्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारला आर्थिक आणीबाणी लागू करावी लागणार आहे. श्रीलंकेचा विदेशी चलन भांडार समाप्त होण्याच्या मार्गावर असून चलनाचे मूल्य नीचांकी स्तरावर पोहोचले आहे. देशात तांदूळ आणि साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे.