कोलंबो
यंदा वषी श्रीलंकेमध्ये आतापर्यंत दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली असल्याची माहिती सरकारच्यावतीने नुकतीच देण्यात आली. डिसेंबरच्या पहिल्या वीस दिवसांमध्ये 47 हजारपेक्षा जास्त पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली असल्याची माहिती पर्यटन मंत्री प्रसन्ना रणतुंगा यांनी नुकतीच दिली. अधिकाऱयांच्या माहितीनुसार डिसेंबरमधली संख्या ही विक्रमी असल्याचे समजते. डिसेंबरमध्ये पर्यटकांच्या विक्रमी संख्येमध्ये वाढ झाली असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे. याचाच अर्थ श्रीलंकतेले पर्यटन आता बहरात आले आहे, असे म्हणायला हरकत नाही. दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचेही पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले असून आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजनाही या निमित्ताने हाती घेतल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेतच पर्यटकांना देशामध्ये प्रवेश दिला जात असल्याचे पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. श्रीलंकन एअरलाइन्सच्या माध्यमातून श्रीलंकेतील पर्यटन स्थळांबाबत प्रसिद्धी मोहीम हाती घेतली जात आहे. पर्यटक संख्या वाढीसाठी हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.