प्रतिनिधी / वास्को
मंगळवारी व बुधवारी रात्री श्रीलंकेहून 291 हवाई प्रवासी दाबोळी विमानतळावर दाखल झाले. हे सर्व प्रवासी भारतीय असून ते श्रीलंकेत अडकले होते. या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना कदंब बसमधून गोव्यातील विविध हॉटेलमध्ये कॉरन्टाईनसाठी पाठविण्यात आले.
बुधवारी उतरलेल्या प्रवाशांपैकी 124 प्रवाशांना बांबोळी बिच रिसॉर्ट तर 5 प्रवाशांना पणजी येथील हॉटेल जिंजरमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले. या प्रवाशांची आज हॉटेलमध्ये रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. या प्रवाशांना घेऊन आलेले युएल 1147 विमान विनाप्रवासी श्रीलंकेकडे रवाना झाले.
मंगळवारी रात्री श्रीलंकेहून 162 भारतीय नागरिक गोव्यात उतरले. एअरबस यूएल 1147 या विमानाने ते दाखल झाले. हे प्रवासीसुध्दा श्रीलंकेत अडकले होते. या प्रवाशांना वास्कोतील हॉटेल्समध्ये कॉरन्टाईन करण्यात आले आहे.
श्रीलंकेहून 162 हवाई प्रवासी दाबोळी विमानतळावर दाखल होताच, रात्रीच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर 60 प्रवाशांना हॉटेल सुप्रिम, 25 प्रवाशांना हॉटेल वेल्ला दी वास्को, 30 प्रवाशांना हॉटेल फ्लोरा दी ग्रॅंड वास्को तर 47 प्रवाशांना हॉटेल ओसिएन व्हीवमध्ये मक्वारंटाईनसाठी पाठवण्यात आले.
काल बुधवारी दाबोळी विमानतळावर 190 प्रवासी दाखल
देशांतर्गंत हवाई प्रवासात काल बुधवारी दाबोळी विमानतळावर 190 हवाई प्रवासी उतरले. दुपारच्या वेळी चार विमानांचे आगमन झाले. परतीच्या प्रवासात चार विमानांतून 83 प्रवाशांनी हैद्राबाद, 120 प्रवाशांनी बेंगळूर तर 236 प्रवाशांनी दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले.
दुपारी एकच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 22 प्रवाशांसह हैद्राबादहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून दुपारी दोनच्या सुमारास 83 प्रवाशांनी हैद्राबादला प्रयाण केले. दुपारी सव्वा एकच्या सुमारास बेंगळूरहून इंडिगो एअरलाइन्सचे विमान 79 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानाने सव्वादोनच्या सुमारास 120 प्रवाशांसह बेंगळूरकडे प्रयाण केले.
दीडच्या सुमारास दिल्लीहून विस्तारा एअरलाईन्सचे विमान 26 प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान अडीचच्या सुमारास 74 प्रवाशांसह दिल्लीकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर अडीचच्या सुमारास दिल्लीहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 63 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानातून साडेतीनच्या सुमारास 162 प्रवाशांनी दिल्लीला प्रयाण केले. काल एकूण 190 प्रवासी गोव्यात हवाईमार्गे दाखल झाले. तर एकूण 439 प्रवाशांनी हैद्राबाद, बेंगळूर व दिल्लीकडे उड्डाण केले.
वास्कोत संसर्ग वाढल्याने हवाई प्रवाशांचा कॉरन्टाईन होण्यास नकार
मंगळवारी रात्री श्रीलंकेहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या 162 प्रवाशांपैकी 60 प्रवाशांना कॉरन्टाईनसाठी वास्को शहरातील हॉटेल सुप्रमीमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, बुधवारी सकाळी या प्रवाशांना वास्कोत करोनाचा संसर्ग वाढल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्यात चलबिचल सुरू झाली. त्यांनी संसर्गाबाबत भिती व्यक्त करून वास्कोतील सदर हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला. आम्हाला वास्कोपासून दूर ठेवण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे या साठ प्रवाशांना कॉरन्टाईनसाठी कळंगुटमधल्या हॉटेलांची निवड करण्यात आली. संध्याकाळी कदंबच्या बसमधून त्यांना कळंगुटला हलवण्यात आले.