चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज लांबविला.
येळ्ळूर / प्रतिनिधी
येळ्ळूरची ग्राम देवता श्री चांगळेश्वरी देवीच्या अंगावरील दांगिने लांबविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. चोरट्यांनी सव्वा तोळय़ाचे मंगळसूत्र आणि चांदीचा छल्ला तसेच नाकातील नथ लांबविले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या चोरीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चांगळेश्वरी मंदिरामध्ये चोरी होण्याची पहिलीच घटना म्हणावी लागेल. यापूर्वी 1963 साली मंदिरातील घंटा चोरीला गेली होती. घंटा चोरलेल्या कुटुंबियांना काही वर्षात गाव सोडावे लागले होते. त्यामुळे या मंदिरामध्ये चोरी करण्याचे धाडस कोणालाच झाले नव्हते.
चोरट्यांनी मंदिरातील दिवे बंद करुन त्यानंतर गाभार्यामध्ये शिरून दागिने लांबविले आहेत. या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. श्वान पथकाचाही आधार घेण्यात आला. मात्र काही अंतरावरच श्वान घुटमळे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली. चोरी झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी मंदिरासमोर मोठी गर्दी केली. त्यानंतर दोन भक्तांनी दोन मंगळसूत्र आणि छल्ला तातडीने देवीला देणगी स्वरुपात दिला.