आज दुपारी होणार सांगता
प्रतिनिधी/ वास्को
श्री दामोदर भजनी सप्ताहाला शनिवारी दुपारी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. उद्योजक प्रशांत जोशी यांनी श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून या सप्ताहाला विधिवत प्रारंभ केला. त्यानंतर उपस्थित भजनी कलाकारांनी भजनाचे सूर आळवले. या प्रारंभानंतर पुढील चोवीस तासासाठी ध्वनीफितीवरून भजन सादर करण्यात आले. या भजनी सप्ताहाची सांगता आज दुपारी श्रीफळ विसर्जन व गोपाळ काल्याने होणार आहे.
भजन सप्ताह उत्सव समितीचे सदस्य, भजनी कलाकार अशोक मनोहर मांद्रेकर (शिवोलकर), अनिल कोंडूरकर, सुर्या शेटय़े, बाबू गडेकर, संतीष धुरी, विनोद मयेकर, शशिकांत उसगावकर, नरेंद्र तोरस्कर, श्याम सुर्या नाईक, प्रकाश च्यारी व जोशी कुटुंबीय अशा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. दरवर्षी हरि नामाच्या घोषाने भजन सप्ताहाला प्रारंभ करणाऱया अशोक मांद्रेकर यांनी भजनाचे सूर आळवून परंपरा राखली व त्यानंतरच्या भजन सादरीकरणासाठी ध्वनीफितीचा वापर करण्यात आला. शांत व सुरळीतपणे या भजनाची सुरवात झाली. केंद्रीय जहाजोद्योग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार क्लाफासियो डायस अशा मान्यवरांनीही सप्ताहाला उपस्थित राहून देवदर्शन घेतले. आज दुपारी साध्या पध्दतीनेच आणि विधिवतरीत्या भजन सप्ताहाची सांगता होणार आहे.
मागच्या वर्षाप्रमाणेच यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे भजनी सप्ताह उत्सव समिती व प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अनुसरून भाविकांनी देवदर्शनासाठी येण्याचे टाळले. काही भाविकांनी दूरवरूनच देवाला नमस्कार केला. मंदिरासमोर पत्र्यांचे कुंपण घालण्यात आलेले आहे.