प्रांताधिकारी सुधीर पाटील यांची नियोजन सभेत माहिती
परगावातील व्यापारीवर्गाला परवानगी नाकारली
देवस्वाऱयांनाही निमंत्रण नाही
साध्यापद्धतीने यात्रेचे आयोजन
वार्ताहर / देवगड:
दक्षिण कोकणची काशी श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा यावर्षी 11 ते 13 मार्च यावर्षी असून ही यात्रा ग्रामस्तरावर साध्यापद्धतीने होणार आहे. तसेच यात्रा कालावधीत ग्रामस्तरावरील भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दरवर्षी परगावाहून येणाऱया व्यापारीवर्गाला दुकाने मांडण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली असून गावातील व्यापारीवर्गालाच परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देवस्वाऱयांनाही निमंत्रण देण्यात येणार नाही. मात्र, यात्रा सुस्थितीत होण्यासाठी प्रशासनाने दरवर्षाप्रमाणेच नियोजन केले आहे, अशी माहिती देवगडचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
कुणकेश्वर देवालय भक्तनिवास सभागृहात गुरुवारी प्रांताधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन सभा घेण्यात आली. यावेळी तहसीलदार मारुती कांबळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके, सरपंच चंद्रकांत घाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, देवस्थान ट्रस्टचे सचिव बाळकृष्ण मुणगेकर, खजिनदार दिनेश धुवाळी, उपसरपंच संदीप आचरेकर, पंचायत समिती सदस्य निकीता कदम, ग्रामसेवक पांडुरंग शेडगे आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी पाटील यांनी जिल्हाधिकाऱयांच्या सुचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 11 ते 13 मार्च या तीन दिवशी होणारी कुणकेश्वर यात्राही ग्रामस्तरावरच आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी परगावाहून किंवा मुंबई येथून येणाऱया भाविकांनी शक्यतो यात्रेला येऊ नयेत. तशाप्रकारे ग्रामस्थांनीही आपल्या नातेवाईकांना सुचना करावी. यात्रेच्यावेळी गर्दी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात येत आहे. तसेच परगावाहून दरवर्षी मोठय़ाप्रमाणात व्यापारीवर्ग दुकाने मांडण्यासाठी येत होते. यावर्षी व्यापारीवर्गाला परवानगी नाकारण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडूनही त्यांना परवानगी देण्यात येणार नाही. ग्रामस्तरावरील यात्रा नियोजन असले तरीही दरवर्षी ज्याप्रमाणे शासकीय प्रशासन यंत्रणा, देवस्थान ट्रस्ट, पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, एस. टी. महामंडळ यांचे नियोजन तसेच असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके यांनी देवस्थान ट्रस्टच्या नियोजनाची माहिती देताना, कोरोनाच्या नियमांचे योग्य पालन केले जाणार आहे. भाविकांच्या दर्शन रांगेत प्रवेश करताना वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर, ऑक्सीमीटर, थर्मलगन तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दर दोन तासांनी संपूर्ण परिसर व देवालयाचे सॅनिटायझरने शुद्धिकरण केले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार असून स्वयंसेवकांची नेमणूक जास्त प्रमाणात केली जाणार आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविक देवालय परिसरात न थांबता परिसराच्या बाहेर जाईल, अशाप्रकारे नियोजन असणार आहे. श्रीदेव कुणकेश्वराचे मुखदर्शन यावर्षी भाविकांना घेता येणार आहे. व्हीआयपी दर्शन व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. प्रशासन व देवस्थान ट्रस्टच्या समन्वयातूनच ग्रामस्तरावरील यात्रा सुस्थितीत होण्यासाठी प्रयत्न राहतील, असे सांगण्यात आले. ग्रामसेवक शेडगे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदृष्टय़ा सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे शुद्धिकरण, स्थानिक व्यापारीवर्गाचे दुकाने नियोजन, तसेच गाडय़ांचे पार्किंग व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन याचे नियोजन केले आहे. परगावाहून येणाऱया व्यापारीवर्गाला दुकाने मांडण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही, असे सांगितले. पोलीस निरीक्षक कातीवले यांनी स्वयंसेवकांबरोबरच पोलीस कर्मचारीही यावर्षी यात्रा कालावधीत बंदोबस्तासाठी असेल, असे नियोजन पोलीस व ट्रस्टच्या नियोजनातून व्हावे. यासाठी स्वतंत्र नियोजन सभा व्हावी. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे स्वयंसेवक व पोलीस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता तो यावर्षी होऊ नये, याची खबरदारी घेण्यात यावी. पार्किंगची व्यवस्था दरवर्षाप्रमाणेच असेल. काही बदल असतील तर त्याला सहकार्य करावे. जास्तीत जास्त गर्दी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेचा प्रयत्न राहील, असे सांगितले. यावेळी जि. प. बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे सर्व रस्ते दुरुस्त करण्याची सुचना प्रांताधिकारी यांनी केली. तसेच इळये वरंडवाडी ते मिठमुंबरी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश करण्यात आले. कुणकेश्वरकडे येणारे जे रस्ते आहेत त्यांची डागदुजी किंवा नवीन कामकाज असेल तर तात्काळ त्याबाबत बांधकाम विभागाने लक्ष द्यावेत, असेही प्रांताधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.