ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांची हिंडलगा गावाला भेट
वार्ताहर / हिंडलगा
कोरोना महामारीचे संकट समोर असल्याने शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून, कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा शांततेत साजरी करा, असे आवाहन बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांनी केले.
दि. 16 ते 20 मार्चदरम्यान हिंडलगा येथे शंभर वर्षांनंतर होत असलेल्या श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या संरक्षणाच्यादृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्याच्या उद्देशाने बुधवार दि. 10 रोजी सकाळी पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांनी हिंडलगा गावाला सदिच्छा भेट दिली. यात्रा भरण्याच्या मांजरेकर कॉलनी येथील लक्ष्मी गदगेच्या ठिकाणाची पाहणी करून यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱयांना भाविकांची सुरक्षा व गैरसोय होऊ नये, याबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत सुनील कुमार यांनी कोरोना महामारीचा धोका टाळण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवावे, भाविकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून कोरोनापासून आपला बचाव करावा, असे आवाहन केले. यात्राकाळात पोलीस प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी यात्रोत्सव संघाचे सेपेटरी प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट करून यात्रोत्सवाच्या आयोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे, मार्गदर्शक रमाकांत पावशे, ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर, उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, सदस्य विठ्ठल देसाई, राहुल उरणकर, रामचंद्र कुदेमानीकर, रविकुमार कोकितकर, राजू कुप्पेकर, परशराम कुडचीकर, तुकाराम फडके, अनिल हेगडे, सदस्या चेतना अगसगेकर, उदय नाईक, विशाल पाटील, संदीप मोरे यांच्यासह यात्रोत्सव संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.