तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
श्री विठ्ठल-रूक्मिणी सेवा समितीच्या माध्यमातून देशभरातील विठ्ठल भक्तांना प्रसाद घरपोच मिळावा, यासाठी पंढरी प्रसाद डॉट कॉम या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि ज्योतिषाचार्य ह. भ. प. अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे अनावरण झाले.
गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही यात्रेसाठी भाविक पंढरपूरला येऊ शकला नाही. आणखी ही स्थिती किती दिवस राहील, याबद्दल हे साशंकता आहे. त्यामूळे पांडुरंगाचा प्रसाद प्रत्येकाला घरपोच मिळावा, यासाठी सेवा समितीने ही योजना सुरू केली आहे. http://www.pandhariprasad.com/ या वेबसाईटच्या माध्यमातून आता भाविक ऑनलाईन शुल्क भरून कुरियरद्वारे पंढरीचा प्रसाद आणि अनेक प्रासादिक वस्तू आपल्या घरपोच मागवू शकतात. त्यामध्ये कुंकू, बुक्का, तुळशीच्या माळा, लाडू प्रसाद, पेढे, अगरबत्ती, चंदनी खोड-सहान, टाळ, श्री विठ्ठलाच्या सर्व प्रकारची मूर्ती, फोटोफ्रेम, सोवळे (कद), उपरणे अशा अनेक प्रासादिक वस्तूंचा समावेश आहे.
पंढरपुरातील प्रमुख प्रासादिक वस्तूंच्या उद्योजकांनी एकत्रित येऊन ही संकल्पना राबवली आहे. या वेबसाइट अनावरण प्रसंगी मेवरिक डेव्हलपर्सचे शैलेश खरात, अनिरुद्ध बडवे, विनायक हरिदास, अजय जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते.