आगामी आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाची घोषणा
कोलकाता / वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील यंदाच्या आवृत्तीसाठी श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असेल. केकेआर प्रँचायझीने बुधवारी ही घोषणा केली. श्रेयसने कर्णधारपदी नियुक्ती हा आपला सन्मान असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
‘कोलकाता नाईट रायडर्ससारख्या प्रतिष्ठेच्या आयपीएल प्रँचायझीने नेतृत्वाची धुरा सोपवली, हा मी माझा सन्मान मानतो. विविध देश व संस्कृतीतील खेळाडूंसाठी आयपीएल हे सर्वोत्तम व्यासपीठ ठरत आले असून सर्वोत्तम सांघिक खेळावर आपल्या संघाचा भर असेल’, असे श्रेयस अय्यर येथे म्हणाला. संघाचे नेतृत्व सांभाळण्याची संधी प्रदान केल्याबद्दल त्याने संघमालक, व्यवस्थापन व सपोर्ट स्टाफचे आभार मानले. शिवाय, हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण हरसंभव प्रयत्नशील असल्याचे अभिवचन दिले.
अलीकडेच संपन्न झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला 15.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले. या अव्वल फलंदाजाने यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सांभाळले आहे.
केकेआरचे प्रशिक्षक ब्रेन्डॉन मेकॉलम यांनी श्रेयसच्या निवडीचे येथे स्वागत केले. ते म्हणाले, ‘सर्वात आश्वासक भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयसचा आवर्जून समावेश होतो आणि हा खेळाडू केकेआरला कर्णधार म्हणून लाभला असल्याने संघ आणखी मजबूत असेल. श्रेयसचा खेळ व त्याची नेतृत्वाची शैली मी जवळून अभ्यासली असून केकेआरमध्ये त्याच्यासमवेत कार्यरत असणे हा उत्तम अनुभव ठरेल, याची मला खात्री वाटते’.
आयपीएल 2022 साठी केकेआर संघ ः आंद्रे रसेल, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, नितीश राणा, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डॉन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकूल रॉय, रसिख दार, बाबा इंदरजीत, चमिका करुणारत्ने, अभिजीत तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, ऍलेक्स हॅलेस, टीम साऊदी, रमेश कुमार, मोहम्मद नबी, उमेश यादव, अमन खान.