प्रत्युत्तरात श्रीलंकेची 6 बाद 86 धावांपर्यंत पडझड, बुमराहचे 15 धावात 3 बळी, मोहम्मद शमीला दुहेरी यश
बेंगळूर / वृत्तसंस्था
श्रेयस अय्यरने 98 चेंडूत 92 धावांची संयमी खेळी साकारल्यानंतर भारताने येथील दुसऱया कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 252 धावांपर्यंत मजल मारली आणि प्रत्युत्तरात लंकेला दिवसअखेर 30 षटकात 6 बाद 86 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवला.
चिन्नास्वामी स्टेडियमवरील या लढतीत भारतीय संघ एकवेळ 5 बाद 126 अशी बिकट स्थितीत होता. पण, श्रेयस अय्यरची धीरोदात्त खेळी महत्त्वाची ठरली. त्यापूर्वी, रिषभ पंतने (26 चेंडूत 39) आणखी एकदा आक्रमक फलंदाजीवर भर दिला होता. पंतला 4 धावांवर मिळालेले जीवदान महत्त्वाचे ठरले. पंतच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने लंकन गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत चौफेर फटकेबाजी केली.
या दिवस-रात्र सामन्यात अन्य सहकारी फलंदाज बरेच झगडत राहिले असताना अय्यरने मात्र 98 चेंडूत 10 चौकार व 4 षटकार फटकावले. लंकन गोलंदाजांनी पहिल्या सत्रात कर्णधार रोहित (15) व विराटसह (23) भारताच्या 4 फलंदाजांना बाद केले होते. पण, अय्यरने नंतर भारताला अडीचशे धावांचा टप्पा सर करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
श्रेयसचे कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक हुकले असले तरी त्याने लंकन गोलंदाजांची केलेली धुलाई लक्षवेधी ठरली. अय्यर नंतर डावखुरा फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनियाला (3-94) पुढे सरसावून उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाला. गुलाबी चेंडू खूपच खाली राहत असल्याने याचा दोन्ही संघांना फटका बसला.
भारताच्या डावात मयांक अगरवाल 4 धावांवर धावचीत झाला तर रोहितला (15) डावखुरा फिरकीपटू एम्बुल्डेनियाने बाद केले. विहारीची 31 धावांची खेळी प्रवीण जयविक्रमाने संपुष्टात आणली. विराट कोहली (23) ऑफस्पिनर धनंजयाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव ः 59.1 षटकात सर्वबाद 252 (श्रेयस अय्यर 98 चेंडूत 10 चौकार, 4 षटकारांसह 92, रिषभ पंत 26 चेंडूत 7 चौकारांसह 39, हनुमा विहारी 81 चेंडूत 31, विराट कोहली 48 चेंडूत 2 चौकारांसह 23. अवांतर 17. एम्बुल्डेनिया 3-94, प्रवीण जयविक्रमा 3-81, धनंजया डीसिल्व्हा 2-32, लकमल 1-12).
श्रीलंका पहिला डाव ः 30 षटकात 6 बाद 86 (अँजिलो मॅथ्यूज 85 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 43, धनंजया 10, निरोशन डिकवेला नाबाद 13, एम्बुल्डेनिया नाबाद 0. अवांतर 1. जसप्रित बुमराह 7 षटकात 15 धावात 3 बळी, शमी 18 धावात 2 बळी, अक्षर पटेल 1-21).