ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इंडियन प्रीमिअर लीगच्या 15 व्या पर्वासाठी आज आणि उद्या मेगा लिलाव होत आहे. या लिलावाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटींना विकत घेतलं आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे.
590 खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. पण आता त्यात 10 नवीन खेळाडूंची भर पडली आहे. त्यानुसार 600 खेळाडूंचा लिलाव आज आणि उद्या होत आहे. मेगा लिलावाची पहिल्यांदा बोली शिखर धवनच्या नावे लागली होती. धवनला पंजाब किंग्जने 8.25 कोटींना विकत घेतलं. तर नाईट रायडर्सने 12.25 कोटींना दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला विकत घेतले आहे. श्रेयस अय्यरवरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला पंजाब किंग्जने 9.25 कोटींना आपल्या टीममध्ये दाखल करुन घेतलं. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज टेंट बोल्टचा राजस्थान रॉयल्सने 8 कोटींमध्ये आपल्या टीममध्ये समावेश केला. बोल्ट यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. डेव्हिड वॉर्नरला संघात दाखल करुन घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्लीच्या संघात चुरस पाहायला मिळाली. अखेर वॉर्नर 6.25 कोटींच्या बोलीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल झाला आहे. द.आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज फॅफ डय़ू प्लेसिस आता विराट कोहलीसोबत खेळणार आहे. 7 कोटींच्या बोलीसह रॉयल चॅलेंजर्सच्या संघात तो दाखल झाला आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉक 6.75 कोटींच्या बोलीसह लखनऊच्या संघात दाखल झाला.