माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील हँडसम बिझनेसमॅन यश म्हणून घराघरात पोहोचलेला श्रेयस आता लवकरच मैदानावर सिक्स फोर फटके मारताना दिसणार आहे. क्रिकेटर प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारीत कौन है प्रवीण तांबे या सिनेमातील श्रेयस साकारत असलेली प्रवीण तांबे यांची भूमिका ही त्याच्या चाहत्यांसाठी ट्रीट असेल.
मराठी मालिकेपासून अभिनयाची सुरूवात करणारया श्रेयसने अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेमातही स्थान मिळवलं. आता जेव्हा कौन है प्रवीण तांबे असं म्हणत सिनेमातून तांबे यांचा प्रवास उलगडण्यासाठी श्रेयस उत्सुक आहे. 2005 साली इक्बाल सिनेमात त्याने क्रिकेटमध्ये एन्ट्री घेणाऱया तरुणाची भूमिका साकारली होती. 17 वर्षांनी पुन्हा श्रेयस क्रिकेटरचे आयुष्य अनुभवणार आहे.
वयाच्या ज्या वर्षी क्रिकेटवीर मैदानाला रामराम ठोकतात त्या 41 व्या वर्षी प्रवीण तांबे यांनी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. राजस्थान रॉयल्स या टीममधून आयपीएल खेळणाऱया तांबे यांनी वय हा फक्त आकडा असतो… उत्साह तुमच्या मनात असतो हा लाइफ फंडा दिला आणि तोच फंडा श्रेयस अभिनयातून दाखवून देणार आहे. तांबे यांचा प्रवासही तितकाच रंजकपणे या सिनेमात मांडला आहे. प्रवीण तांबे यांनी मुंबई रणजीपासून त्यांनी खेळायला सुरूवात केली. एकीकडे छोटय़ामोठय़ा नोकरया तर दुसरीकडे क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न असा त्यांचा प्रवास होता. अखेर 2012मध्ये विजय हजारे टुर्नामेंटमधील त्यांची कामगिरी कर्णधार राहुल द्रवीडने हेरली आणि तांबे यांची जयपूर प्रंचायसीमध्ये वर्णी लागली. त्यानंतर आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघाचा ते भाग बनले. श्रेयस तळपदे या प्रत्येक प्रसंगाला, अनुभवाला प्रवीण तांबे टच देणार आहे.