अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा प्रियदर्शन जाधव हा बायकोला हवं तरी काय या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शकाची भूमिका निभावत आहे. तसेच श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी हे प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
एका पत्नीला आपल्या पतीमध्ये काय हवं असतं? रुबाबदार दिसणारा अभिनेता, सिंघम सारखा पोलीस अधिकारी, शांतता प्रिय अध्यात्मिक गुरू किंवा दबदबा असणाऱया राजकारण्यासारखा कोणीतरी. आणि मग अशा अनेक गगनउंची गाठलेल्या अपेक्षांसह, प्रत्येक पत्नीला असे वाटते की देवाने तिच्याच पतीमध्ये हे सर्व गुण का नाही दिले. अशीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल बायकोला हवं तरी काय ही एक विनोद आणि मनोरंजनाने परिपूर्ण वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. एक सामान्य गफहिणी (श्रेया बुगडे) आपल्या भक्तीने श्रीकृष्णाला (निखिल रत्नपारखी) प्रसन्न करते आणि त्या बदल्यात परमेश्वराकडे तिच्या नवऱयाला, तिच्या नजरेतल्या सर्वोत्कृष्ट जीवनसाथीच्या प्रतिमेनुसार अपग्रेड करायची मागणी करते हे वेबसिरीजच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळतंय. प्रियदर्शन जाधव याने या 6 भागांच्या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून तो वेबसिरीज बद्दल सांगताना म्हणाला, प्रत्येकाला आयुष्यात आपण अपग्रेड व्हायला हवं असं नेहमीच वाटत. नवीन गाडी मध्ये अपग्रेड करावा असं वाटतं, मोठं घर घेऊन अपग्रेड व्हावं अस वाटत… पण काय होतं जेव्हा आपण आपल्या साथीदाराला अपग्रेड करायला जातो? या कथेतून हाच हास्यवर्धक, मनोरंजनाचा कल्लोळ श्रेया, अनिकेत आणि निखिलच्या परफेक्ट टायमिंगसह गोड संदेश देत आपल्या भेटीला येत आहे आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांना सिरीज पाहताना ही तितकाच आनंद मिळेल.