जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चाकुरकर यांची माहिती : त्या रुग्णाचा मृत्यू श्वसनाच्या तीव्र आजाराने
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या त्या कोरोना निगेटिव्ह रुग्णासारखेच कोरोना निगेटिव्ह निघालेले, परंतु तीव्र श्वसनाचा आजार असलेले आणखी पाच ते सहा रुग्ण असून त्यांना वाचवण्याचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यातील दोन रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. या रुग्णांपैकी कुणालाही कोरोनाची बाधा झालेली नसली, तरी सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. जनतेमध्ये गैरसमज वा भीतीचे वातावरण नको, यासाठीच ही माहिती देत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या त्या रुग्णाची हिस्ट्री स्पष्ट करताना डॉ. चाकुरकर म्हणाले, त्या रुग्णाला दाखल करताना तीव्र श्वसनाचा आजार होता. त्याच्या फुफ्फुसाची एक बाजू निकामी झाली असल्याचे तपासण्यांमध्ये आढळून आले होते. त्याला थोडाफार तापही होता. त्यातच त्याची काही लक्षणे कोरोना सदृश वाटत होती. त्यामुळे त्याला कोव्हिड-19 ट्रिटमेंट बरोबरच श्वसनाच्या आजारावरील सर्व उपलब्ध ट्रिटमेंट सुरू होती. परंतु, शर्थीचे प्रयत्न करूनही तो वाचू शकला नाही. याच दरम्यान त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीकरीता मिरज येथे पाठविण्यात आले होते. मिरज लॅबवर लोड असल्यामुळे या स्वॅबचा अहवाल येण्यास एक दिवस उशीर झाला. तत्पूर्वीच या रुग्णाचा मृत्यू झाल्याने आम्ही देखील घाबरलो होतो. स्वॅबचा रिपोर्ट काय येतो, याची आम्हाला धाकधूक होती. मात्र रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला. मात्र तरीही या रिपोर्टची वाट पाहण्यापूर्वीच आम्ही हा रुग्ण ज्या गावात राहात होता, त्याच्या घरापासून एक किलोमीटरपर्यंतच्या सर्व क्षेत्रात आम्ही युद्धपातळीवर सर्व्हे मोहीम राबवून कोरोना सदृश लक्षणे असलेले रुग्ण आहेत का, याची तपासणी पूर्ण केली. त्या परिसरात कुणीही असा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला, असे ते म्हणाले.
लक्षणे नसलेलेही पॉझिटिव्ह निघू शकत : असल्याने घ्यावी लागते चाचणी!
डॉ. चाकुरकर पुढे म्हणाले, ‘आज जगभरातील परिस्थिती पाहता सर्वांनीच कोरोनाचा जबरदस्त धसका घेतला आहे. जिल्हय़ाबाहेर काही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह असे रुग्ण ‘आयडेन्टीफाय’ झाले आहेत की, ज्यांना कोरोनाची काहीच लक्षणे नव्हती. फक्त विदेशी नागरिकांच्या सहवासात आल्याची त्यांना हिस्ट्री असल्यामुळे लक्षणे नसतानाही त्यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत ते कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. सिंधुदुर्गात सापडलेला व बरा होऊन गेलेल्या त्या एकमेव रुग्णालाही कोरोना सदृश अशी कोणतीही लक्षणे नव्हती. परंतु, रेल्वेतून प्रवास करताना तो विदेशी नागरिकाच्या सहवासात आल्यामुळे त्याची तपासणी करण्यात आली होती व त्यात तो पॉझिटिव्ह निघाला होता. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वरील प्रकारे हिस्ट्री असलेल्या वा मुंबई, पुण्याहून आलेल्यांना क्वारंटाईन अथवा आयसोलेट करून त्यांची स्वॅब टेस्ट घेण्याचे सक्त आदेश असल्याने अनेकांना अशा प्रकारे कोरोना सदृश म्हणून ट्रिट केले जात आहे. परंतु, असे असले तरी क्वारंटाईन वा आयसोलेट केलेल्यांनी आपल्याला कोरोना झालाय असा ग्रह करून घाबरून जाऊ नये. आतापर्यंत अशा पद्धतीने ट्रिट केलेले अनेकजण व्यवस्थित होऊन सुखरुपपणे घरी परतले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला एक रुग्ण देखील याठिकाणी बरा होऊन घरी गेला आहे. त्यामुळे घाबरून न जाता आणि वरील प्रकारची हिस्ट्री वा लक्षणे न लपवता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या प्रक्रियेला सामोरं जावं व स्वत: बरोबरच स्वत:च्या कुटुंबाचीही व पर्यायाने पूर्ण समाजाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.