परमात्मराज महाराज यांचे प्रतिपादन : आडी मठात दत्त जयंती साधेपणाने
प्रतिनिधी/ निपाणी
कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनात विविध संकटे उद्भवली आहेत. त्या सर्व संकटांवर जय मिळविण्याचा दृढ संकल्प दत्त जयंतीच्या निमित्ताने करावा. जयंती म्हणजे जय मिळविणारी, जयंती म्हणजे जय प्रदान करणारी, दत्त जयंती ही सर्वांच्या जीवनात जय मिळवून देणारी ठरावी, असे विचार प. पू. परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र आडी (ता. निपाणी) येथील संजीवनीगिरी डोंगरावरील दत्त देवस्थान मठामध्ये दत्त जयंती सोहळय़ानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परमात्मराज महाराज म्हणाले, दृढ संकल्पाने असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होऊन जातात. त्यामुळे कोणत्याही संकटाने खचून न जाता त्या संकटावर जय मिळवणारच, असा प्रबळ आशावाद व प्रबळ प्रयत्नवाद उराशी बाळगणे आवश्यक आहे.
2020 साली तीव्र वेगाने आलेल्या संकटांना नामशेष करण्यासाठी आता 2021 साली तीव्र वेगाने झटले पाहिजे. संकटांवर जय मिळवलाच पाहिजे. जयंती शब्दाचा रुढार्थ व ध्वनितार्थ वर्तेट ग्रंथात सांगितला आहेच. परमाब्धि ग्रंथ व्यवस्थित समजून घेण्यासाठी वर्तेट, सत्पोष, महोन्नय इत्यादी ग्रंथांचे वाचनही भाविकांनी करावे, असे आवाहनही परमात्मराज महाराज यांनी केले.
दरवषी दत्त जयंतीच्या निमित्ताने परमाब्धिप्रसार महोत्सव मोठय़ा प्रमाणात होत असतो. परंतु यंदा कोरोना संकटाची पार्श्वभूमी असताना शासकीय नियमांचे पालन करून अत्यंत मोजक्मया भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी दत्त जयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी देवीदास महाराज, राम महाराज, नामदेव महाराज, चिदानंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अमोल महाराज, मारुती महाराज, समाधान महाराज, श्रीधर महाराज आदी उपस्थित होते.
चिकोडीत दत्त जयंती सोहळा
चिकोडी : प्रति नृसिंहवाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिकोडी येथील पुरातन व जागृत नरसिंह सरस्वती दत्त मंदिरात कोरोना नियमांचे पालन करत दत्त जयंतीनिमित्त अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.
सकाळी काकड आरती, महापूजा, रुद्राभिषेक, काने बुवा यांचे कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम झाले. सायंकाळी शहर व परिसरातून आलेल्या दत्त भाविकांच्या सान्निध्यात दत्त महाराजांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील दत्त भक्त उपस्थित होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सावळाराम जोशी-भटजी व सहकाऱयांच्या पौरोहित्याखाली विविध धार्मिक विधी करण्यात आले.