शिये / वार्ताहर
शिये ( ता. करवीर ) येथील माजी उपसरपंच व स्टोन क्रशर व्यवसायिक यशवंत आबू पाटील यांनी १५ भाडेकरूंना चाळीस हजार रुपये भाडे माफ करून संकट काळात माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या यशवंत पाटील यांचे शिरोली औद्योगिक वसाहती लगत श्रीराम नगर, शिये येथे घर आहे. या घरात औद्योगिक वसाहतीत काम करणारी सुमारे पंधरा कुटुंबे भाड्याने राहत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्यामुळे सर्वच भाडेकरू घरी आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पाटील यांनी एक महिन्याचे सुमारे चाळीस हजार रुपये घरभाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाडेकरूंना संकट काळात मोठा दिलासा मिळाला आहे.