सुमारे शंभर चालकांनी घेतला लाभ, इंधन दरवाढीचा निषेध
प्रतिनिधी / वास्को
पेट्रोल व डिझेलचे दर भडकल्याने त्रस्त बनलेल्या सामान्य नागरिकांच्या वेदनेकडे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी वास्कोतील मोटरसायकल टॅक्सी पायलट तसेच टॅक्सी रिक्षा चालकांना सवलतीच्या दरात पॅट्रोलचे वितरण केले. यावेळी त्यांनी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाई प्रकरणी केंद्र सरकारचा निषेध केला.
यासाठी वास्को शहरातील एका पेट्रोल पंपाचा आधार घेण्यात आला. सुमारे शंभर मोटरसायकल व रिक्षा चालकांनी या सवलतीचा लाभ घेतला. प्रती लिटर पन्नास रूपये दराने संकल्प आमोणकर यांनी या इंधनाचे वितरण केले. आमोणकर यांच्या या उपक्रमाबद्दल रिक्षा व मोटरसायकल टॅक्सी चालकांनी समाधान व्यक्त केले व इंधनाचे दर भडकल्याने नाराजीही व्यक्त केली. बुधवारी दुपारी हा उपक्रम पार पडला. यावेळी मुरगावचे काँग्रेस कार्यकर्तेही उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी इंधनाचे दर आता आवाक्याबाहेर गेलेले असून या वाढत्या महामार्गमुळे जनता त्रस्त बनलेली असल्याचे स्पष्ट करून केंद्र सरकार व राज्य सरकारचाही निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने 35 रूपये दराने पेट्रोल देण्याचे आश्वासन देत काँग्रेसविरूध्द प्रचार केला होता, त्या आश्वासनांची आठवण करून देणारे फलक झळकावले.
संकल्प आमोणकर यांनी यावेळी बोलताना इंधन दर वाढीबद्दल केंद्र सरकारवर कडक टीका केली. इंधनावर लादलेला कर कमी करून ही महागाई दूर करावी अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की काँग्रेसच्या काळात कच्चा तेलाची किंमत प्रती बॅरल शंभर डॉलर होती. तेव्हा भारतात पेट्रोलचा दर जवळपास साठ रूपये होता. आता प्रती बॅरल पन्नास डॉलर आहे. तरीही पेट्रोलचा दर प्रती लिटर सध्या 83 रूपये आहे तर देशात इतर ठिकाणी हा दर 90 रूपयांपर्यंत गेलेला आहे. मोटरसाय टॅक्सी पायटल, रिक्षा व्यवसायीक व इतर व्यापरी वर्ग कोरोना काळातील लॉकडॉऊनमुळे आधीच आर्थिक संकटात आहे. या लोकांना आर्थिक दिलासा मिळायला हवा. मात्र, त्यांना महागाईत ढकलण्यात आलेले आहे असा आरोप आमोणकर यांनी केला.सर्वसामान्य माणसाला आज त्याच्या कमाईतला 25 टक्के वाटा प्रवासावर खर्च करावा लागत आहे. या इंधन महागाईचा फटका बाजारातील भाजीपाल्यासह सर्वच वस्तूना बसणार असून सर्वसामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली भरडली जाणार आहे.भाजपाच्या राज्यात श्रीमंत माणूस श्रीमंत बनत चाललेला आहे. तर गरीब माणूस अधिकाअधिक गरीब बनत चाललेला आहे अशी टीका करून त्यांनी भाजपा सरकारचा निषेध केला.
त्या प्रचाराशी व गटाशी आमचा संबंध नाही, पेट्रोल वितरण योग्य दरानेच – परेश जोशी
दरम्यान, वास्कोतील उद्योजक व गोवा पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष परेश जोशी यांनी एका गटाने आपल्या पेट्रोलपंपजवळ महागाईविरूध्द केलेल्या प्रचाराबाबत आपल्या आस्थापनाला कोणतीही आगाऊ माहिती नव्हती असे स्पष्ट करून त्या प्रचाराशी आमचा संबंध नसल्याचे प्रसिध्दी पत्रकाव्दारे म्हटले आहे.आपल्या कर्मचाऱयांनी त्या ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार इंधन पुरवले व नित्य दराप्रमाणेच पैसे वसुल केलेले आहेत. मात्र, नंतर त्या ग्राहकांना एका गटाने इंधन खरीदण्यासाठी मदत केल्याची माहिती कर्मचाऱयांना ग्राहकांकडूनच समजली,आम्ही कुणालाही स्वस्तात इंधन दिलेले नाही. इंधन दरवाढीविरूध्द प्रचार करणारे ते कोण होते, याबाबतही आम्ही अनभिन्न आहेत. त्यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही. सर्वसाधारण जनता व ग्राहकांच्या हितासाठी हा खुलासा करण्यात येत असल्याचे परेश जोशी यांनी म्हटले आहे.