प्रतिनिधी/ पणजी
सुमारे 70 ते 80 टक्के सरकारी खात्यांची संकेतस्थळे (वेबसाईट्स) बंद असून ती अद्ययावत करण्यात आलेली नसल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेले अडथळे दूर करण्याचे निर्देशही त्यांनी खात्यांना दिले असून जनतेला येण्यासाठी वाट मोकळी करावी, असे बजावले आहे. ..काल मंगळवारी दक्षता जागृती सप्ताहाच्या कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते.
सचिवांनी त्वरित लक्ष घालावे
मुख्यमंत्री म्हणाले की, संबंधित खात्यांच्या सचिवांनी बंद असलेल्या किंवा अद्ययावत (अपडेट) नसलेल्या संकेतस्थळांची दखल घेऊन ती कार्यरत करावीत. मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिवांचे ते काम नव्हे. सचिवांनी त्यात लक्ष घालावे.
संकेतस्थळे बंद असल्याने जनतेवर अन्याय
संकेतस्थळे बंद असल्यामुळे व त्यांची वेळोवेळी सुधारणा केली जात नसल्याने सर्वसामान्य माणसाला विनाकारण वारंवार हेलपाटे मारावे लागतात. एखाद्या कामासाठी 10 वेळा सरकारी कार्यालयात जाण्याची पाळी येते. संकेतस्थळे बंद असल्याने त्याचे जनतेवर असे परिणाम होतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
अनेक कर्मचारी, अधिकाऱयांमध्ये कामचुकारपणा
अनेक सरकारी कर्मचारी कार्यालयात येतच नाहीत. घरी राहून काम करीत असल्याचे भासवतात. त्यांना खातेप्रमुख जाब विचारत नाहीत, अशी वस्तुस्थिती असल्याचे डॉ. सावंत यांनी निदर्शनास आणले. अनेक सरकारी कर्मचाऱयांनी याविषयी माहिती दिल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्या फाईल्स हातावेगळय़ा झाल्या किंवा केल्या आणि कोणत्या फाईल्स अडवून ठेवल्या जातात याचा तपशील आपण घेतला असून त्याबाबत योग्य ती कार्यवही केली जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सूचित केले.
प्रवेशद्वारावरील अडथळे त्वरित दूर करा
कोरोनाचा संसर्ग आता कमी होत असून अनेक सरकारी कार्यालयात लोकांनी येऊ नये किंवा मर्यादित प्रमणात यावे म्हणून प्रवेशद्वारावर टेबले, खुर्च्या घालून अडथळे करण्यात आले आहेत. ते त्वरित हटवावेत. जनतेला येण्या जाण्यासाठी पूर्ण मोकळीक द्यावी. लोकांना येण्या जाण्यासाठी प्रवेशद्वार मोकळे करावे, असे डॉ. सावंत यांनी बजावले. गोवा राज्य हागणदारीमुक्त झाले असले तरी अनेक घरांना शौचालय नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली.