प्रतिनिधी /शिरोडा
मगो पक्षाचे कार्यकर्ते संकेत मुळे यांनी शिरोडा मतदार संघात गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत तसेच निरंकाल भागातील पूरग्रस्तांना साहाय्य केले आहे. शिरोडा मतदार संघातील बऱयाच गावांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. तसेच काही गरीब विद्यार्थ्यांची गरज ओळखून संकेत मुळे यांनी त्यांना स्मार्टफोन उपलब्ध करुन दिले आहेत.
राज्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारने मोफत स्मार्टफोन द्यावेत, अशी मगो पक्षाची मागणी आहे. सरकारकडून ही मदत मिळेपर्यंत गरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने आपण स्मार्टफोन विकत घेऊन दिले आहेत. आत्तापर्यंत एकूण सहा गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन दिले असून अजूनही काही विद्यार्थ्यांना देण्याचा विचार आहे, असे संकेत मुळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना वहय़ांचे वाटप
दरम्यान शिरोडा मतदारसंघातील विविध गावातील विद्यार्थ्यांना वह्य़ा पुस्तकांचे वाटपही संकेत मुळे यांच्याकडून करण्यात आले आहे. वाजे शिरोडा येथे वहय़ा वितरीत केल्यानंतर बोलताना संकेत मुळे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात कुणीही राजकारण आणू नये. सध्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याकडून विद्यार्थ्यांना जेवढी मदत होईल, तेवढी देण्याचा आपला प्रयत्न आहे. यावेळी अनिल कोरडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
निरंकाल भागातील पूरग्रस्तांना मदत
दरम्यान निरंकाल दाभाळ भागातील पूरग्रस्तांना संकेत मुळे यांनी कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. उण्णय नदीला आलेल्या पुरात निरंकाल भागातील काही लोकांना फटका बसलेला आहे. पुरामुळे लोकांचे जीवन उद्धवस्त झाले असून त्यांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य असल्याचे मुळे यांनी सांगितले. या महापुरात लोकांची बेसुमार नुकसानी झाली असून पूरग्रस्तांना आपण केलेली ही मदत केवळ नाममात्र आहे. सरकारकडून लवकरात लवकर त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी संकेत मुळे यांनी यावेळी केली.