ढोल, ताशा, फटाक्याविना दुसऱया वर्षीही शांततेत विसर्जन : कांही मंडळांचे आज विसर्जन
प्रतिनिधी/ संकेश्वर
‘मंगलमूर्ती मोरय्या, गणपती बाप्पा मोरय्या, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात मंगळवारी दुपारच्या सुमारास संकेश्वर येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. एकापाठोपाठ एक अशा मूर्तींचे हिरण्यकेशी नदीत विसर्जन करण्यात आले. पण काही मंडळानी मंगळवारी मूर्ती विसर्जन करु नये, या श्रद्धेपोटी बुधवारी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अकरा दिवसापासून संकेश्वर नगरीत 30 गणेश उत्सव मंडळानी श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करून विधीवत पूजाअर्चा केली. मंगळवारी विसर्जनच्या पार्श्वभूमिवर सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकीच्या तयारीची लगबग सुरू झाली होती. यंदा पोलीस प्रशासनाने डॉल्बी, फटाके व वाद्य मुक्त मिरवणूक काढण्याची सूचना केल्याने विनावाद्य मिरवणूक निघाली. दुपारपासून रात्री 10 पर्यंत विसर्जन मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीत ‘मंगलमूर्ती मोरय्या, गणपती बाप्पा मोरय्या, मोरय्या मोरय्या गणपती बाप्पा मोरय्या, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला होता. यंदाही या मंडळांनी परंपरा कायम केल्यामुळे या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीबद्दल शहरवासीयांतून कौतुक होताना दिसत होते.
दुसऱया वर्षीही शांतता
गतवर्षी संकेश्वर शहराचे गावखातेदार पाटील यांचे सुपूत्र डॉ. सचिन पाटील यांचे अपघाती निधन झाल्यामुळे शहर शोकाकुल बनले होते. या दु:खद प्रसंगी विसर्जन मिरवणूक शांततेत काढण्यात आली होती. यंदाही कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकीवर मर्यादा आणल्या गेल्या. त्यामुळे विसर्जन मिरवणूक शांततेच्या वातावरणात झाली. यंदा गणेश चतुर्थी सार्वजनिक स्वरुपात करायची की नाही, अशी चर्चा होत होती. पण शेवटच्या टप्प्यात सार्वजनिक उत्सवला नियमांचे कडक बंधन घालून परवाना देण्यात आला. त्यामुळे उत्सवावर विरजन पडले होते. बाप्पा पुढच्यावर्षी असे कोणतेच संकट तुझ्या उत्सवात येऊ नये अशी प्रार्थना विसर्जन प्रार्थनेवेळी प्रत्येकजण करताना दिसत होते.