प्रतिकिलो 600 रुपये : बॅडगी, गुंटूर, गरुडाचेही दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर
प्रतिनिधी / संकेश्वर
यंदा मिरची दरात उच्चांकी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी ती अधिकच तिखट झाली आहे. आंतरराज्य बाजारपेठेत संकेश्वर मिरचीला अधिक पसंती दिली जात आहे. संकेश्वर मिरचीचा दर 600 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. उत्पादनात झालेली घट आणि वाढती मागणी यामुळे संकेश्वर मिरचीचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. संकेश्वर मिरचीसोबतच अन्य जातीच्या मिरची दरातही तेजी असल्याचे बाजारपेठेत पहावयास मिळत आहे.
संकेश्वर मिरची दर्जेदार आणि चटणीसाठी चांगली आहे. जास्त काळ चवीला टिकावू व लालभडक रंगाची आहे. इतर मिरची पावडरमध्ये संकेश्वर मिरचीची पावडर मिश्रण केली जाते. संकेश्वर मिरची दर्जेदार असल्यामुळे आंतरराज्य बाजारपेठेतही मिरची भाव खावून जाते. संकेश्वर मिरचीचे संकेश्वर, व्हन्नहळ्ळी, हत्तरवाट, हिटणी व नेर्ली या भागात उत्पादन घेतले जाते. गत 4 वर्षांपासून पावसाळी हंगामात अतिवृष्टी झाल्याने संकेश्वर मिरची उत्पादन घट झाली आहे.
उत्पादनात घट, दरात वाढ
मसाले उत्पादक मार्केटमध्ये दाखल होऊन मिरची खरेदी करीत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. संकेश्वर मिरची उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेत आवक घटली आहे. दरम्यान मागणी अधिक आणि घटलेली आवक यामुळे संकेश्वर मिरचीला अधिकचा दर मिळत आहे. सध्या प्रतिकिलो 600 रुपये दराने याची विक्री सुरु असल्याची माहिती मिरची विक्रेते राजू बांबरे यांनी दिली.
ांकेश्वर बाजारात असलेले मिरचीचे दर
मिरचीची जात | किंमत |
---|---|
संकेश्वर मिरची | 600 |
बॅडगी नं-1 | 300 |
बॅडगी ढब्बू | 330 |
बॅडगी केडीमल | 320 |
बॅडगी काश्मिर | 340 |
बॅडगी रेशमीपत्ता | 400 |
बॅडगी संकेश्वर स्थानिक | 300 |
गरुडा जवारी | 220 |
तेजा | 200 |
गुंटूर | 180 |